अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही गेले काही महिने मनोरंजनसृष्टीपासून थोडी लांब आहे. ती सध्या कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात दिसत नसली तरीही ती तिच्या युट्युब चॅनलवरून आणि सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. आतापर्यंत तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप निर्माण केली. ‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी मालिकांमधून तर ‘दिया और बाती हम’, ‘एक तारा’ यांसारख्या हिंदी मालिकेकांत ती झळकली. परंतु त्यानंतर ती मालिकांमध्ये दिसली नाही. आता तिने स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे.
उर्मिला निंबाळकर ही आता एक लोकप्रिय युट्युबर म्हणून ओळखली जाते. ‘उर्मिला निंबाळकर’ हा तिचा स्वतःचा यु ट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती रोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या टिप्स देत असते. या तिच्या युट्यूब चॅनलचे ८ लाखांहून अधिक सबसक्राईबर्स आहेत. सध्या ती मालिका विश्वापासून दूर राहून तिच्या या युट्यूब चॅनलकडे लक्ष देत आहे. तसंच मातृत्वाचा आनंद उपभोगते. ती मालिकांमध्ये का दिसत नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता उर्मिलानेच याचं उत्तर दिला आहे.
आणखी वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”
उर्मिलाने नुकतीच ‘थिंक बँक’ या युट्युब चॅनलला एक मुलाखत दिली. यात तिने सांगितलं, “मालिकांमध्ये काम करत असताना मी दिवसातले कमीतकमी १४ तास तर कधीकधी १७ ते १८ तास सलग शूटिंग करायचे. हे सगळ्याच मालिकांच्या बाबतीत घडतं असं माझ्या लक्षात आलं. या जीवशैलीचा माझ्या आरोग्यावर प्रचंड परिणाम व्हायला सुरुवात झाली. मी जर कधी आजारी पडले तरी औषध घेऊन, सलाईन लावून काम करायला लागायचं.”
हेही वाचा : “साडीतून दिसणाऱ्या या कमनीय बांध्याच्या…” अभिनेत्री उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत
पुढे ती म्हणाली, “मला काम भरपूर मिळत होतं पण मला ते करायचं नव्हतं. याचं कारण म्हणजे अशा पद्धतीने काम करून आपलं असं आयुष्यच नसणं मला मान्य नव्हतं. ते काम करून मी अजिबात खुश नव्हते. त्याचप्रमाणे त्यावेळी ओटीटी हे माध्यमही लोकप्रिय होत होतं आणि त्यामुळे मालिकांमध्ये काम करताना कामाचं खूप प्रेशर होतं. मी ज्या प्रकारच्या मालिकेत काम करते त्यापेक्षा खूप वेगळा कॉन्टेन्ट मी प्रेक्षक म्हणून बघायचे. म्हणून मला असं वाटायचं की हे काम आपण फक्त पैसे मिळवण्यासाठीच करायचंय का? आपल्या कामातून आपल्याला समाधानही मिळायला हवं. या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे माझी इतक्या वेळा तब्येत बिघडायची की मला भेटण्यासाठी माझ्या आई बाबांना दवाखान्यात यायला लागायचं. त्यामुळे मी मालिकांमध्ये काम करणं थांबवलं,” असा खुलासा उर्मिलाने केला आहे.