Star Pravah : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका गेल्यावर्षी २ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत आई-बाबांचं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य, घरगुती जबाबदाऱ्या अशी कौटुंबिक गोष्ट पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांसारखे दमदार कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्या भूमिकांची नावं शुभा व यशवंत किल्लेदार अशी आहेत.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य मकरंद किल्लेदार ही भूमिका साकारत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने तो या मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मालिका सोडण्यापूर्वी “मकरंद या भूमिकेतून मी तुमचा निरोप घेत आहे” अशी पोस्ट आदिशने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.
आता आदिशने अचानक मालिका सोडल्यावर त्याच्याऐवजी मकरंदच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार, रिप्लेसमेंटची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत मकरंदच्या रुपात एक नवीन अभिनेता झळकला आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला आदित्य म्हणजेच अभिनेता अमित रेखीने आता ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री घेतलेली आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत अमित रेखी इथून पुढे आदिश ऐवजी मकरंद किल्लेदार हे पात्र साकारणार आहे.
अमित रेखी पोस्ट शेअर करत लिहितो, “तुमच्यासाठी ‘मकरंद किल्लेदार’ ही भूमिका घेऊन येत आहे… ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ पाहायला विसरू नका…” त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अमितला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका दुपारी २:३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. ही मालिका दुपारच्या स्लॉटला प्रक्षेपित होत असली तरीही या शोचा टीआरपी खूपच चांगला आहे.