Aetashaa Sansgiri & Nishad Bhoir Talks About Their Lovestory : अभिनेत्री एतशा संझगिरी व निषाद भोईर यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. दोघे गेली काही वर्षं एकमेकांना डेट करीत होते. काही दिवसांपूर्वीच दोघांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करीत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना शेअर केली. अशातच आता या जोडीनं त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
एतशा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आजवर अनेक मालिकांमध्ये मुख्य नायिका म्हणून काम केलं आहे. त्यासह तिनं हिंदीतही काम केलंय; तर निषादनंही काही मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या असून, सध्या तो ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून दिसत आहे.
एतशा व निषाद यांनी इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करीत त्यांचा साखरपुडा झाल्याची गोड बातमी त्यांच्या चाहत्यांसह काही दिवसांपूर्वीच शेअर केली. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनी एतशा-निषाद यांच्या फोटोंखाली कमेंट्स करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच आता या दोघांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
कोल्हापुरमध्ये झालेली पहिली भेट
मुलाखतीत एतशानं पहिल्या भेटीबद्दल सांगितलं, “आम्ही कोल्हापूरला भेटलो दोघे जण. त्याला मी पहिल्या दिवशी दादा म्हणणार होते. ‘दख्खनचा राजा जोतिबा’च्या सेटवर मुलींसाठी एक खोली होती आणि मुलांसाठी एक होती. तो ज्या मुलांबरोबर राहायचा, त्यांना मी दादा म्हणायचे. त्यामुळे याला एकट्याला नाही म्हटलं, तर कसं दिसेल ते. म्हणून मी त्याला त्याची जन्मतारीख विचारली आणि कळलं की, तो एकच वर्षानं मोठा आहे. मग मी त्याला नावानंच हाक मारली. ती आमची पहिली भेट होती. तो माझा खूप चांगला मित्र झाला होता. त्याचेही कोल्हापुरात खूप चांगले मित्र होते. त्यामुळे मला काही हवं असेल, तर त्याच्याशी बोलायचे.”
निषाद पुढे त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल म्हणाला, “मला कळत होतं की, तिला रस आहे यामध्ये; पण ती सगळ्यांशीच चांगली वागायची. त्यामुळे मला कळत नव्हतं की, मीही त्यातलाच एक आहे की नाही. त्यामुळे एक दिवस तिथे माझ्या शूटचा शेवटचा दिवस असताना मी तिला भेटायला बोलावलं आणि आम्ही रंकाळा येथे गेलो. त्या दिवशी दोघे पहिल्यांदाच एकत्र असल्यामुळे खूप गप्पा मारल्या, खूप काही खाल्लं. त्यानंतर गप्पांमध्येच इतके हरवलो होतो की, महत्त्वाचा मुद्दा मी तिला सांगितलाच नव्हता. मग घर जवळ आल्यानंतर मी तिला म्हटलं की, मला तू आवडतेस. ती म्हणाली की, मलाही तू आवडतोस. आपण प्रयत्न करून बघूयात जुळतंय का की नाही. कारण- तू खूप वेगळा आहेस. मी खूप वेगळी आहे. मी शांत आणि ती खूप बोलकी आहे.”
मी तिला गाडीत प्रपोज केलं – निषाद
निषाद पुढे म्हणाला, “त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. त्या दिवशी मी तिला गाडीत प्रपोज केलं.” लग्न करण्याबद्दल पुढे एतशा व निषाद यांनी सांगितलं की, चार वर्षं डेट केल्यानंतर हळूहळू गोष्टी पुढे सरकत गेल्या. एतशा याबद्दल म्हणाली, “आम्ही भेटलो तेव्हा आम्ही २७-२८ वर्षांचे होतो त्याला भेटल्यानंतर मला हव्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्यामुळे मला असं वाटलं की, हे होऊ शकतं आणि आमच्या रिलेशनशिपला दोन महिने झाले असतानाच मी घरी सांगितलं होतं. कारण- घरी माझ्यासाठी स्थळं पाहणं सुरू होतं. त्यामुळे त्यांना कल्पना देऊन ठेवलेली.”
निषाद पुढे याबद्दल म्हणाला, “पहिल्यापासून लग्नाचा विचारच होता डोक्यात. आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या सगळा विचार केला आणि आम्ही एकमेकांच्या आयुष्यात आल्यापासून आमच्यामध्येही खूप चांगले बदल झाले आहेत.”