मराठी मालिका, चित्रपट व रंगभूमी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. दोघेही गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. दोघांचाही फिटनेश आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या-अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात. गेली २८ वर्षे दोघांनीही एकमेकांना खंबीरपणे साथ दिली आहे. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांची फिल्मी लव्हस्टोरी जाणून घेऊया…
ऐश्वर्या नारकर यांचं माहेरचं नाव पल्लवी आठल्ये असं होतं. रंगभूमीवर काम करताना पल्लवी आणि अविनाश यांची ओळख झाली. नाटकाबरोबरच तेव्हा अविनाश एका प्रसिद्ध मालिकेत काम करत होते. त्यामुळे मोठे अभिनेते असल्याने ऐश्वर्या सुरुवातीला त्यांच्याशी फार बोलत नव्हत्या. नाटकाच्या प्रयोगाला एकत्र बसने प्रवास करताना हळुहळू या दोघांची एकमेकांशी ओळख झाली.
अखेर दौरा संपल्यावर अविनाश नारकरांनी त्यांच्या मनातील भावना पल्लवी यांना सांगितल्या. त्यानंतर दोघंही एकेदिवशी आठल्येंच्या (ऐश्वर्या नारकरांचं माहेर) घरी गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी गेले होते. यावेळीच अविनाश नारकरांनी पल्लवीला लग्नासाठी मागणी घातली. नाटक, मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच अविनाश नारकर तेव्हा नोकरीला सुद्धा होते. त्यामुळे आठल्येंच्या घरुन दोघांच्या लग्नाला संमती मिळाली.
हेही वाचा : मृण्मयी देशपांडेच्या संसाराला ७ वर्षे पूर्ण! नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाचा फोटो शेअर करत म्हणाली…
दोघांचं लग्न ३ डिसेंबर १९९५ ला पार पडलं आणि पल्लवी आठल्ये पुढे ऐश्वर्या नारकर झाल्या. लग्नानंतर सुद्धा अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये या जोडप्याने एकत्र काम केलं. आज त्यांच्या लग्नाच्या २८ व्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओला त्यांनी “आमच्या सुखी वैवाहिक आयुष्याचे १० हजार २२७ दिवस” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या लेकाचं बारसं थाटामाटात पडलं पार, नाव ठेवलंय खूपच खास…
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या अविनाश नारकर ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांची भूमिका साकारत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत.