Aishwarya & Avinash Narakar Dance Video : ‘शेकी’ गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातल्यावर आता संजू राठोडचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं नाव आहे ‘सुंदरी’. संजूचं हे नवीन गाणं सध्या जगभरात ट्रेंड होत आहे. हळुहळू मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी सुद्धा ‘सुंदरी’ गाण्यावर थिरकू लागले आहेत. मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारकर जोडप्याने नुकताच ‘सुंदरी’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

ऐश्वर्या व अविनाश नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. हे दोघंही विविध ट्रेंडिंग गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवून कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी ऐश्वर्या नारकरांनी खास डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी पारंपरिक लूक करत ‘सुंदरी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. हा व्हिडीओ अवघ्या काही तासातच सर्वत्र व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी नारकर जोडप्याच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘सुंदरी’ गाण्याबद्दल सांगायचं झालं, तर . हे गाणं संजूने गायलं असून या गाण्याचा संगीतकार व गीतकार सुद्धा तो स्वत: आहे. या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे.

“क्युट कपल”, “या सुंदरीचं नाव काय हाय हे सर्वांनाच माहिती आहे”, “सुंदर जोडी”, “तोड नाही असा डान्स”, “अविनाश भाऊ ऐकत नाहीत…दोघांची एनर्जी कमाल आहे”, “असं आयुष्य जगावं”, “खऱ्या अर्थाने तुम्ही दोघंही मेड फॉर इच अदर आहात”, “लय भारी डान्स”, “तुम्ही दोघंही कसले गोड आहात…दिसताय सुद्धा मस्त” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अविनाश नारकर सध्या ‘तारिणी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तर, ऐश्वर्या नारकर आता लवकरच ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर नारकर जोडपं एकत्र झळकेल कारण, अविनाश सुद्धा याच नाटकात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.