Aishwarya & Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमातून या जोडप्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या हे एव्हरग्रीन कपल विदेशात फिरायला गेलं आहे. या ट्रिपचे फोटो, व्हिडीओ दोघांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ऐश्वर्या व अविनाश नारकर सध्या आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत व्हिएतनाम फिरण्यासाठी गेले आहेत. व्हिएतनाममध्ये हे दोघंही धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी या ट्रिपदरम्यान अनेक मजेशीर व्हिडीओ देखील बनवले आहेत.
व्हिएतनाम फिरायला गेल्यावर या जोडप्याने नुकतीच या देशातील एका खास आणि लोकप्रिय टुरिस्ट जागेला भेट दिली. हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. या हनोईमधील प्रसिद्ध ‘ट्रेन स्ट्रीट’ला नारकर जोडप्याने भेट दिली आहे. याठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला हॉटेल्स, भाजी मंडई आणि स्थानिक नागरिकांची घरं आहेत. हा रेल्वे ट्रॅक सतत गजबजलेला असतो आणि या रेल्वे ट्रॅकवरून ट्रेन जाताना पाहता यावी यासाठी पर्यटक इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी याच सुंदर ठिकाणी भेट देऊन याठिकाणचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
यापैकी एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अविनाश नारकर रेल्वे ट्रॅकवरून एकमेकांचा हात धरून चालत असल्याचं पाहायला मिळतंय. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये अविनाश नारकर इतर पर्यटकांना “रेल गाडी रेल गाडी झुक झुक…” हे गाणं म्हणून दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या दोन्ही व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने या व्हिडीओवर, “ट्रेन स्ट्रीट… इथे कधीच ट्रेन वेळेवर येत नसते” अशी कमेंट केली आहे. यावर ऐश्वर्या नारकरांनी सुद्धा ‘हो’ असं उत्तर दिलं आहे. तर, अन्य चाहत्यांनी “मस्त मजा करा”, “क्युट व्हिडीओ”, “मस्त मॅडम तिथे रील्स खूप बनवा” अशा प्रतिक्रिया नारकरांच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.