९०च्या दशकापासून आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या नारकर. अनेक नाटक, मालिका व सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरची धमाल-मस्ती तसेच सहकलाकारांबरोबर शूट केलेले डान्स व्हिडीओदेखील त्या सोशल मीडियावर शेअर करीत असतात. पण, आता ऐश्वर्या नारकर यांनी एक असा व्हिडीओ शेअर केला आहे; जो सगळ्यांनी आवर्जून पाहण्याची आवश्यकता आहे. ऐश्वर्या नारकर यांचं प्राणीप्रेम तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या घरी पाळीव मांजरदेखील आहे. नेहमीच त्या प्राण्यांबद्दल काळजी व्यक्त करताना दिसतात. असाच काहीसा एक व्हिडीओ त्यांनी आज प्रेक्षकांबरोबर शेअर केलाय. त्यांच्याबरोबर घडलेला एक भीतिदायक प्रसंग त्यांनी या व्हिडीओद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवलाय.

हेही वाचा… सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालबरोबर दोन वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा? अभिनेत्रीने ‘खास’ PHOTOS केले होते शेअर

व्हिडीओची सुरुवात करीत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “नमस्कार, काल जरा एक गोंधळ झाला म्हणून आवर्जून हा व्हिडीओ करतेय. काल माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी गेली होती. एक-दोन तासांनी तिकडून मला फोन आला की, तुमच्या आजूबाजूला काही मांजरं आहेत का? तर मी म्हटलं हो; खूप आहेत का काय झालं? तुमच्या गाडीत माजरांची तीन छोटी बाळं सापडली आहेत. हे त्यांनी मला सांगितलं.”

ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या, “माझ्या पोटात अक्षरश: गोळा आला. कारण- आदल्याच दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये एका मांजरीनं तीन पिल्लांना जन्म दिला होता आणि पावसापाण्याचे दिवस असल्यानं ती पिल्लं सुरक्षित राहावीत म्हणून आम्ही त्या पिल्लांना एका बॉक्समध्ये ठेवलं होतं. पण, ती मांजर कधी तिच्या बाळांना माझ्या गाडीत घेऊन गेली कधी आणि तिनं तिच्या बाळांना माझ्या गाडीत ठेवलं हे कळलंसुद्धा नाही. गाडी १४-१५ किलोमीटर चालली तरीसुद्धा ही बाळं सुरक्षित होती. ही अक्षरश: देवाची कृपा आहे.”

“मग त्या सर्व्हिसिंगच्या माणसांनी त्या बाळांना सोडवलं आणि त्यांच्या आईला भेटवलं. आता ते सगळेच सुरक्षित आहेत; पण यावरून मला अगदीच आवर्जून सांगायचंय. पावसापाण्याचे दिवस आहेत. जर तुमच्या आजूबाजूला मांजरं असतील. जर कुठल्या मांजरीनं पिल्लं दिली असतील, तर कृपया गाडी सुरू करण्याआधी बोनेट उघडून त्याच्यात टॉर्च मारून पिल्लं आहेत का बघा. गाडीच्या खालीसुद्धा बघा. कारण- आपल्याला कळत नाही आणि या बाळांचा उगाचच जीव जाऊ शकतो. म्हणून कृपया करून एवढी काळजी घ्या. धन्यवाद”, असंही ऐश्वर्या नारकर म्हणाल्या. “कृपया, कार सुरू करण्यापूर्वी तुमच्या कारचे बोनेट तपासा”, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलीय.

हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अभिनेत्री खलनायिकेची भूमिका साकारत आहे.