Harshada Khanwilkar on Naughtiest Person on Lakshmi Niwas set:  चित्रपटांत, मालिकांमध्ये दिसणारे कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. अनेकदा मालिकांतील कलाकारांची भूमिका पाहून ते प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात कसे असतील याचा अंदाज प्रेक्षक बांधतात. अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल त्यांना जाणून घ्यायचे असते.

अलीकडेच सोशल मीडियावर अनेक कलाकार विविध पोस्ट शेअर करत असतात. आपल्या सहकलाकारांबरोबर मजा मस्ती करत असतात. त्यामुळे पडद्यामागे काय घडते, हे काहीवेळा पाहायला मिळते. तसेच विविध मुलाखतींमध्ये कलाकार आपल्या सहकलाकारांबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. आता ‘लक्ष्मी निवास’फेम अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी त्यांच्या सहकलाकाराबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

‘लक्ष्मी निवास’च्या सेटवर सगळ्यात खट्याळ कोण?

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी नुकतीच टाइम महाराष्ट्रशी संवाद साधला. यावेळी सगळ्यात खट्याळ मूल कोण आहे, कोण साधं आहे यावर हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “साधं कोणीच नाही. सगळ्यात खट्याळ भावना म्हणजेच अक्षया आहे. लोकांना वाटतं की किती साधी दिसते, पण ती सगळ्यात मस्तीखोर आहे, ती माझी लाडकीसुद्धा आहे.”

अक्षयाबद्दल पुढे त्या म्हणाल्या, “मला वाटतं की प्रत्येक मालिकेत कुटुंब बनत जातं. कुठूनतरी सुरुवात होते, तर तो मला सापडलेला माझा मित्र आहे. आम्ही एकमेकींना सतत हे म्हणतो की, आपल्याला एकमेकांना भेटायला थोडा वेळ लागला, पण पुढच्या आयुष्यात तिला हवं असेल किंवा नसेल ती माझ्या आयुष्याचा भाग असणार आहे आणि ते नाही झालं तरी मी तिच्या आयुष्याचा भाग असणार आहे.”

याआधी अक्षया देवधर आणि दिव्या पुगावकरनेदेखील विविध मुलाखतींमध्ये हर्षदा खानविलकर सेटवर सगळ्यांची किती काळजी घेतात याबद्दल वक्तव्य केले होते. तसेच, मालिकेत हरिशची भूमिका साकारणारा अभिनेता अनुज ठाकरेनेदेखील हर्षदा खानविलकर त्याच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते.

हर्षदा खानविलकर यांनी आधी ज्या मालिकांमध्ये काम केले, त्या मालिकांमधील कलाकारांबरोबरदेखील त्यांचे आजही चांगले बॉण्डिंग असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेबद्दल बोलायचे तर ही गोष्ट लक्ष्मी व श्रीनिवासची आहे. मालिकेत विविध कुटुंबे, विविध घटना पाहायला मिळतात. अनेक संकटांवर मात करत लक्ष्मी व श्रीनिवास त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.