मुंबई ही स्वप्नांची नगरी… पण या मुंबईत राहण्यासाठी जागा मिळाली म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्याचं स्वप्नांची पूर्तताच झाल्यासारखं असतं. मुंबईत घर घेण्यासाठी अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकीच एक म्हणजे धर्म बघून घर नाकारणे. प्रसिद्ध अभिनेत्याला घर घेताना धर्माच्या आधारावर भेदभावाचा सामना करावा लागला आहे. काश्मिरी मुस्लीम असल्याने घर घेताना करावा लागलेल्या भेदभावाचा खुलासा स्वत: अभिनेत्याने केला आहे.

हा अभिनेता म्हणजे अली गोनी. अली हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्याने ‘ये है मोहब्बतें’सारख्या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘लाफ्टर शेफ’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अली गोनी अभिनेत्री जस्मिन भसीनला डेट करत आहे. दोघेही नुकतेच नवीन घरात राहायला गेले आहेत. पण एका मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला की, त्यांना घर शोधणे सोपे नव्हते. मुस्लीम असल्याने त्यांना घरं नाकाराण्यात आली होती.

‘इनकंट्रोव्हर्सियल’ या पॉडकास्टमध्ये अली गोनीने त्याच्या घर घेण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी त्याने खुलासा केला की, एक प्रसिद्ध अभिनेता असूनही मुंबईतील काही घरमालकांनी त्यांना घर देण्यास नकार दिला. याबद्दल अभिनेता म्हणाला की, “काश्मिरी मुस्लीम असल्याने मला इंडस्ट्रीत कधीही कोणत्याही भेदभावाचा सामना करावा लागला नाही. पण घर शोधत असताना मला याचा अनेकदा अनुभव आला. मी आणि जास्मिन घर शोधत होतो; पण अनेकांनी आम्हाला घर देण्यास नकार दिला. कारण त्यांचं म्हणणं होतं की ते मुस्लिमांना घर देत नाहीत. त्यापैकी बहुतेक जण हे वयस्क होते.”

यापुढे अलीने सांगितलं की, “या क्षेत्राने मला बऱ्यापैकी स्वीकारले आहे इंडस्ट्रीत संघर्ष हा असतोच आणि हे सर्वत्र आहे. ऑडिशन प्रक्रियेपासून ते शोमधील कास्टिंगपर्यंत, मला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. आजकाल लोक सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्ध होतात. पण कधीकधी जेव्हा कास्टिंग डायरेक्टर विचित्र कारणे देऊन आम्हाला कास्ट करण्यास नकार देतात, तेव्हा आम्हाला स्वतःवर शंका यायची. आजच्या तरुण कलाकारांना ऑडिशन म्हणजे काय हे माहित नाही. पण मला इंडस्ट्रीतील लोकांकडून पाठिंबा मिळाला आहे. विशेषतः एकता कपूरने मला तिच्या शोमध्ये टिकवून ठेवले.”

दरम्यान, अभिनेता अली गोनीच्या आजवरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने ‘स्प्लिट्सविला ५’, ‘व्ही द सीरियल’, ‘ये है मोहब्बतें’, ‘कुछ तो है तेरे मेरे दरमियां’, ‘ये कहां आ गये हम’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘ढाई किलो प्रेम’, ‘दिल ही तो है’, ‘नागिन ३’, ‘खतरों के खिलाडी ९’, ‘बिग १९’, ‘बिग बॉस ४’ यांसारख्या शोमध्ये सहभाग झाला आहे. सध्या तो ‘लाफ्टर शेफ सीझन २’ मध्ये दिसत आहे. यामध्ये रीम शेखबरोबर त्याची जोडी आहे.