Amar Upadhyay Talk’s About Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ ही मालिका आजपासून (२९ जुलै) सुरू होत आहे. एक काळ गाजवलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचं हे दुसरं पर्व आहे. त्याकाळी तब्बल आठ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं. अशातच आता मालिकेचं दुसरं पर्व किती दिवस सुरू राहणार याबाबत यातील मुख्य नायक अमर उपाध्यायने खुलासा केला आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मध्ये मीहिरची भूमिका साकारणारा अभिनेता अमर उपाध्यायने ‘स्क्रीन’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं आहे. मालिकेबद्दल बोलताना अमरने सांगितलं की, जेव्हा ‘बालाजी टेलिफिल्मस’ने त्याला मालिकेच्या दुसऱ्या पर्वासाठी विचारलं, तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. त्याचा विश्वास बसत नव्हता. अभिनेता म्हणाला, “मला जेव्हा सांगण्यात आलं, तेव्हा मला वाटलं की गंमत करत आहेत. कारण तेव्हा या मालिकेबद्दल काही चर्चासुद्धा सुरू नव्हती.”
अमर उपाध्याय पुढे म्हणाला, “मला बोलावण्यात आलं आणि तारखा काढायला सांगितलं तेव्हा मी विचारलं की तुलसीची भूमिका कोण साकारत आहे. त्यावर स्मृतीचं नाव ऐकल्यानंतर मी म्हटलं, तिला वेळ आहे का? कारण ती राजकारणात व्यग्र असते. त्यामुळे पहिले पाच मिनिट माझा विश्वासच बसला नाही, कारण ही खूप मोठी मालिका होती; त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरू करणं ‘स्टार प्लस’ वाहिनीसाठी आव्हान होतं. आमच्या सगळ्यांवर ही खूप मोठी जबाबदारी आहे. कार्यक्रमाचा टीआरपी खूप चांगला होता, आम्ही ‘केबीसी’लासुद्धा सुरुवातीचे तीन महिने मागे सोडलं होतं.”
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मधून पुन्हा एकदा अमर उपाध्याय स्मृती इराणी यांच्याबरोबर काम करणार आहे. स्मृती यांच्यासह पुन्हा काम करण्याबद्दल अभिनेता म्हणाला, “आम्ही मीहिर व तुलसी या भूमिका साकारल्या होत्या आणि आम्ही एकत्र खूप छान दिसायचो. ती खूप चांगली आहे, हुशार आहे आणि उत्कृष्ट कलाकार आहे. आम्ही जिथे थांबलेलो, तिथूनच पुन्हा सुरुवात केली आहे. आता जेव्हा तिला मी पुन्हा भेटलो, तेव्हा मला ती पूर्वीसारखीच वाटली. थोडासा बदल झालेला फक्त. आम्ही ५-६ एपिसोडचं चित्रीकरण केलं आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे.”
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’मध्ये काय बदल झाला आहे?
‘क्योंकि सास भी कभी बहू थी२’ कडून प्रेक्षकांना असलेल्या अपेक्षांबद्दल बोलताना अमर म्हणाला, “काळ बदलला आहे, त्यानुसार आम्ही बदल केला आहे. मुलं बदलली आहेत. घर बदललं आहे. मीहिर व तुलसी ही पात्रं तशीच आहेत. आम्ही जुन्या गोष्टींना नव्याने उजाळा देत आहोत, त्यानुसारच मालिकेत बदल झाले आहेत.”
मीहिरच्या भूमिकेबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “मीहिरमध्ये थोडासा बदल झाला आहे. आता तो मोठा उद्योजक झाला आहे. पहिल्या पर्वात त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं होतं आणि तो भारतात परतला असून वडिलांच्या व्यवसायात मदत करणार होता. आता तो मोठा उद्योजक झाला असून तो त्यामध्ये प्रयोग करत असतो. पण, स्मृती आणि माझं ऑनस्क्रीन नातं तसंच आहे.”
मालिका किती काळ चालणार याबाबत अमर उपाध्यायचा खुलासा
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ किती दिवस सुरू राहणार याबद्दल नायकानेच खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मालिकेबद्दल प्रचंड चर्चा होत आहे, त्यामुळे आतापर्यंत तरी चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे कदाचित ही मालिका १० महिने किंवा वर्षभर चालेल.”