Ankita Walawalkar Instagram Video : सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस १९’ हा शो दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात रोज होणारे वाद, बदलणारी नाती आणि नाट्यमय प्रसंग प्रेक्षकांना आवडत आहेत. अशातच आता या आठवड्यात दुसरा ‘वीकेंड का वार’ होणार असून, यामध्ये सलमान खान पुन्हा एकदा स्पर्धकांची झाडाझडती घेताना दिसणार आहे.
या आठवड्यात अमाल मलिक, अवेज दरबाज, मृदुल तिवारी, कुनिका सदानंद आणि तान्या मित्तल हे पाच स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामुळे यांपैकी शोमधून कोण बाहेर जाणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसंच या आठडव्यात एका नव्या स्पर्धकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचं वृत्तही समोर आलं आहे.
‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व गाजवलेल्या अंकिता वालावलकरची एन्ट्री होणार आहे. याबद्दल स्वत: अंकितानेच व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये अंकिता असं म्हणते, “नमस्कार मंडळी! जसं की तुम्हाला माहितीये, ‘बिग बॉस’ हिंदीच्या घरात माझी वाईल्ड कार्ड एन्ट्री होतेय आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या वेळेस मी ‘बिग बॉस’ बघितला नव्हता. पण आता, माझ्या गाठीशी अनुभवसुद्धा आहे. त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम दिलंत, आशीर्वाद दिलेत.”
यापुढे ती “तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर राहूद्या. तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफीपर्यंत…” असं म्हणतेय्, तोच या व्हिडीओत एक ट्विस्ट येतो. अंकिताचं वाक्य पूर्ण होत नाही; तोपर्यंत कुणाल म्हणजेच तिचा नवरा आणि तिची बहीण तिला झोपेतून उठवतात. म्हणजेच अंकिता बिग बॉसचं स्वप्न बघत असते. या स्वप्नात ती वरील वाक्य बोलत असते आणि तिचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आत नवरा नी बहीण तिला उठवतात.
“आता गेम बदलणार कारण वाइल्ड कार्ड एंट्री होणार…” अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम व्हिडीओ
धनंजय पोवार या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये म्हणतात, “कुणाल बाळा माझी ईच्छा तू पूर्ण केलीस. मित्रा आज खूप आनंद झाला. जोरात मारलंस ना?” तर प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरने अरे यार मी खूप उत्सुक होते असं म्हटलंय. तर अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर हिने “अरे यार काय गं?” अशी कमेंट केली आहे. तसंच अंकिताच्या अनेक चाहत्यांनी तुझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशा काही प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अंकिता वालावलकर सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने प्रसिद्ध आहे. अंकिता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिने ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. ती या शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.