Nikki Tamboli turns Vegan : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी हिने तिच्या लाइफस्टाइलमध्ये एक मोठा व महत्त्वाचा बदल केला आहे. ईदच्या निमित्ताने, निक्कीने तिच्या सोशल मीडियाद्वारे अधिकृतपणे व्हिगन झाल्याची घोषणा केली. सध्या अभिनेता अरबाज पटेलला डेट करत असलेल्या निक्कीने म्हटलं की हा निर्णय तिने स्वतःसाठी घेतला आहे, याचा तिच्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही.
निक्कीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये “गो व्हिगन” असं लिहिलं होतं. “व्हिगन डाएट नाही, हा तुमच्या मनाने घेतलेला निर्णय आहे. कारण मला या जगात जो बदल पाहायचा आहे, त्याची स्वतःपासून सुरुवात आहे,” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं.
व्हिगन व्हायची प्रेरणा कशामुळे मिळाली याबद्दल निक्कीने सांगितलं. “बऱ्याच काळापासून मी या निर्णयाबद्दल विचार करत होते आणि शेवटी माझ्या अंतर्मनाने मला हा निर्णय घेण्यास प्रेरणा दिली. जगण्यासाठी कोणत्याही प्राण्याला मरण्याची गरज नाही हे मला आता समजलंय,” असं निक्की म्हणाली. यासंदर्भात इ-टाइम्सने वृत्त दिलंय.
निक्कीची पोस्ट
बकरी ईदच्या वेळी प्राण्यांच्या कुर्बानी दिली जाते, त्याचा उल्लेख निक्कीने केला. “मी ‘बकरी ईद’ सणाच्या विरोधात आहे, अल्लाहच्या नावावर लाखो बकऱ्यांचा बळी दिला जातो, हे मला मान्यच नाही. आता मला हा विचारही सहन होत नाही,” असं निक्की म्हणाली.
बदलाची सुरुवात घरातून होते, असं निक्कीला वाटतं. “बदलाची सुरुवात घरापासून सुरू होते आणि म्हणूनच यासाठी विश्वास दृढ करायचा होता. त्यासाठी मला स्वतःला आजच व्हिगन व्हायचं होतं. आता मला खूप शांत वाटतंय,” असं निक्की म्हणाली.
काय खावं हे नातं ठरवू शकत नाही – निक्की
निक्कीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल मुस्लीम आहे. तिच्या नात्याचा या निर्णयावर परिणाम होण्याबद्दल निक्की म्हणाली, “माझं नातं किंवा माझी डेटिंग लाइफ मी काय खावं हे ठरवू शकत नाही. माझ्यासाठी, माझे व्यक्तिमत्व आणि स्वतःशी असलेलं माझं नातं ही प्रायोरिटी आहे आणि मी त्याबरोबर कोणत्याही प्रकारे तडजोड करू शकत नाही.”
मी स्वतःच्या मनाचं ऐकते – निक्की तांबोळी
“धर्म आणि फूड चॉइस या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि लोकांनी या दोन्ही एकत्र करू नये. मी स्वतःच्या मनाचं ऐकणारी आहे, कायम अशीच असेन,” असं निक्की तांबोळी म्हणाली.