Marathi Actor Share Vitthal Temple Experience : प्रत्येक गोष्टीसाठी एखादा योग जुळून यावा लागतो असं म्हणतात. हा योग जूळून आला की, तुमच्या आयुष्यात एखादी घटना नियोजित नसूनही ती पूर्ण होते. याला कधी कोणी चमत्कार म्हणतं, कोणी दैवी अनुभव म्हणतं, तर कोणी आणखी काही. पण ज्याच्याबरोबर ही घटना घडली आहे, त्याला मात्र याचं नेमकं वर्णन करता येत नाही. असंच काहीसं झालं होतं एका मराठी अभिनेत्याबरोबर.
मराठी अभिनेता अतुल तोडणकरने त्याचा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचा एक विलक्षण अनुभव शेअर केला आहे. कोणतंही पूर्वनियोजन न करता अतुल विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गेला आणि त्याला दर्शन मिळालंही. हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अतुलने विठ्ठलाच्या दर्शनाचा विलक्षण अनुभव शेअर केला आहे.
याबद्दल अतुल म्हणाला, “आम्ही कार्तिकी एकादशीला सहज दर्शन घ्यायचं म्हणून निघालो. खरंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्हाला माहीतही नव्हतं की, त्यादिवशी कार्तिकी एकादशी आहे. तेव्हा एकादशीनिमित्त प्रचंड गर्दी होती. मी एका माणसाला फोन केला होता, तर तोसुद्धा म्हणाला की, दादा आज का येत आहात? आज जवळपास सात ते आठ लाख लोक दर्शनासाठी येत असतात.”
अतुल तोडणकर इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे त्याने सांगितलं, “गर्दीबद्दल माहीत असूनही आम्ही गेलो. तेव्हा कोणीही आमची गाडी अडवली नाही. आम्ही मंदिराच्या जवळपास गेलो. मग गाडी पार्क केली. त्यानंतर अचानक एक मास्क लावलेला माणूस येतो आणि आम्हाला मंदिरात घेऊन जातो. तेव्हा आम्हाला वाटलेलं की, फारफार मुखदर्शन होईल. पण तो म्हणाला, नाही तुम्हाला मंदिरात विठ्ठलाच्या समोर जाऊन आपण दर्शन करू.”
यापुढे अतुल म्हणाला, “विठ्ठलाच्या दर्शनानंतर मी आणि माझी पत्नी विठ्ठलाकडे बघून फक्त रडायला लागलो. इतक्या गर्दीतही आमच्यासाठी दोन्ही बाजूच्या रांगा थांबवण्यात आल्या होत्या. तेव्हा कळतच नव्हतं की हे कसं घडलं? जिथे जाऊ शकणार नाही असं वाटलं होतं, तिथे तुमचं थेट विठ्ठलाचं दर्शन होतं. माहित नाही तेव्हा नेमकं काय झालं? पण काहीतरी झालं होतं इतकं नक्की.”
यापुढे अतुलने सांगितलं, “एखाद्या चित्रपटातल्या सीनसारखं आमच्याबरोबर घडत आहे असं आम्हाला वाटलं. तेव्हा मला कळलं की, बाप्पा आपल्याबरोबर आहे आणि तो काहीना काही करत असतो. त्यामुळे ती भावना नेमकी काय होती? हे मला सांगता येणार नाही.” दरम्यान, अतुल तोडणकर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो.