Balika Vadhu Fame Avika Gor Got Married : हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौरच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशातच आता अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अविका गौरने तिचा प्रियकर मिलिंद चंदवानीसह लग्नगाठ बांधली आहे.

‘कलर्स टीव्ही’वरील गाजलेली मालिका ‘बालिका वधू’मध्ये अविका गौरने आनंदी ही भूमिका साकारलेली. आजही अनेक जण तिला या मालिकेतील भूमिकेसाठी ओळखतात. काही दिवसांपासून ती या वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमातून झळकत आहे. त्यामध्ये हिंदी टेलिव्हिजनवरील इतरही अनेक सेलिब्रिटी कपल्सनी सहभाग घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवरच अविका व मिलिंद यांचं लग्न पार पडलं.

अविका गौरच्या लग्नासाठी लोकप्रिय सेलिब्रिटींची उपस्थिती

‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवर काही दिवसांपासून अविका व मिलिंद यांच्या संगीत, मेहंदी व हळदीचा कार्यक्रम पार पडत होता आणि आता अखेर हे दोघे अगदी थाटामाटात याच कार्यक्रमाच्या सेटवर लग्नबंधनात अडकले. दोघांनी अगदी पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं असून, त्यांच्या लग्नाला हीना खान, रॉकी जैस्वाल,रुबिना दिलैक , ईशा मालवीय, मुनव्वर फारुकी, सोनाली बेंद्रे ही मंडळी उपस्थित होती. अविका व मिलिंद यांचं लग्न थाटामाटात पारंपरिक पद्धतीनं नॅशनल टेलिव्हिजनवर पार पडलं.

लग्नासाठी अविकानं लाल रंगाचा लेहेंगा त्यावर हिरव्या रंगाचे दागिने व हातात बांगड्या परिधान केल्याचं पाहायला मिळतं. तर मिलिंदनं यावेळी क्रीम कलर्चीरची शेरवानी व त्यावर गुलाबी रंगाचा फेटा परिधान केला आहे. लग्नासाठी दोघांनी शाही लूक केल्याचं पाहायला मिळालं. लग्नाच्या वेळी मिलिंदनं स्कूटरवरून एन्ट्री घेतली. त्यावेळी तो खूप उत्सुक असल्याचं दिसलं.

‘स्क्रीन’शी संवाद साधताना अविकानं तिच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, जेव्हा पहिल्यांदा ती मिलिंदला भेटलेली तेव्हा त्यानं तिला फ्रेंडझोन केलेलं. तिनं सांगितलं की, मिलिंद चंदवानीबरोबर ती लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी अनेकांनी तिला लाँग डिस्टन्स रिलेशनशिप ही चांगली कल्पना नाही, असं म्हटलेलं. परंतु, त्यांनी त्यांचं नातं टिकवलं आणि आता ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे.