Bhau Kadam : ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेलं लोकप्रिय नाव म्हणजेच भाऊ कदम. आजवर अनेक चित्रपट, कॉमेडी शोजमध्ये काम करून भाऊ कदम यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘चला हवा येऊ द्या’च्या सध्या सुरू असलेल्या नव्या सीझनमध्ये सुद्धा प्रेक्षक प्रामुख्याने भाऊ कदम यांना मिस करतात.
‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये भाऊ कदम यांनी विविध पात्रं साकारली. या सगळ्या भूमिकांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. याशिवाय शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींनी सुद्धा भाऊ कदम यांचं भरभरून कौतुक केलं होतं. जवळपास दहा वर्षे या शोचा पहिला सीझन सुरू होता. ‘चला हवा येऊ द्या’मुळे भाऊ कदम यांचं संपूर्ण आयुष्य पालटलं. या शोबद्दल त्यांनी नुकत्याच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये वर्णी कशी लागली? याबद्दल सांगताना भाऊ कदम म्हणाले, “तेव्हा ‘फू बाई फू’ कार्यक्रम सुरू होता. तिथे साबळे सूत्रसंचालन करत होता. मी खरंतर आधी ‘फू बाई फू’ हा शो करणार नव्हतो. आधीच्या तीन सीझनला मी नकार दिला होता. त्यानंतर, मुलीने आणि बायकोने मला खूपच फोर्स केला की, तुम्ही ‘फू बाई फू’ करा. तुम्हाला लोक ओळखतील. पण, माझं असं होतं…लोक ओळखून काय करणार? मला यायला पाहिजे ना. पण, शेवटी मी गेलो…असं मनात ठरवलं होतं की नाही जमलं तर, दुसऱ्यावेळी काढतील आता आपण जाऊयात, जमतंय का पाहुयात.”
“मला शोमधून काढणार हे माझ्या डोक्यात मी ठेवलं होतं. सुरुवातीला मला जमत सुद्धा नव्हतं पण, राकेश सारंग यांनी मला तेव्हा खूप पाठिंबा दिला. तेव्हा सतिश तारे यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. तिथेच साबळे होता मग आम्ही ‘चला हवा येऊ द्या’ केलं.” असं भाऊ कदम यांनी सांगितलं.
शाहरुख खानचा किस्सा…
भाऊ कदम सांगतात, “चला हवा येऊ द्या’मध्ये मला निलेश साबळेने बऱ्याच गोष्टी करायला सांगितल्या. शाहरुख करायला सांगितला…जेव्हा शाहरुखने मला पाहिलं तेव्हा तो सुद्धा मला बघून खूप खूश झाला होता. तेव्हा तो मला म्हणाला होता, “असा शाहरुख तर मी सुद्धा पाहिला नाहीये” याचं श्रेय आमच्या टीमचं होतं. माझ्याकडून या सगळ्या भूमिका साबळेने करून घेतल्या. सलमान, शाहरुख, शांताबाई अशी अनेक पात्रं मी साकारली…सर्वजण कौतुक करायचे. अनेकदा वाटायचं…यांना खरंच आवडलं असेल ना? कारण, इतक्या कौतुकाची आपल्याला सवय नसते.”
