Bigg Boss 19 Pranit More : ‘बिग बॉस १९’ मध्ये सहभागी झालेल्या प्रसिद्ध कॉमेडीयन प्रणित मोरेला गेल्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळताना दिसतोय. डॅनी पंडित, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांसारखे लोकप्रिय इन्फ्लुएन्सर प्रणितला जास्तीत जास्त व्होटिंग करा असं आवाहन प्रेक्षकांना करत आहेत. शोमध्ये एन्ट्री घेतल्यापासून अल्पावधीतच प्रणितने सर्वांची मनं जिंकून घेतली.

‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यापासून प्रणितचे बसीर अली व अमाल मलिक यांच्याशी वाद झाले आहेत. या वादादरम्यान प्रणितवर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्याने कायम आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं.

यादरम्यान, बहुतांश इन्फ्लुएन्सर्सनी प्रणितला पाठिंबा देत बसीर अलीवर टीका केली होती. अगदी शोमध्ये सहभागी होणाऱ्या गौहर खानसारख्या पाहुण्यांनी सुद्धा प्रणितचं कौतुक केलं. मात्र, हे सगळं असूनही गेल्या वीकेंड वारला बसीरला जास्त स्क्रीन टाइम मिळाला नाही असा दावा त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येत होता. आता अंकिता वालावलकरने सुद्धा याबाबत भाष्य केलं आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर पोस्टमध्ये लिहिते, “पहिल्या आठवड्यात, सगळे मराठी प्रेक्षक प्रणितच्या समर्थनात बोलत होते. गेल्या आठवड्यात सुद्धा त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा होता. पण, ‘वीकेंडच्या वार’ला प्रणितला झिरो स्क्रीन टाइम देण्यात आला. म्हणजे तो अजिबातच स्क्रीनवर दिसत नव्हता. या आठवड्यात सुद्धा त्याला कमीत कमी दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर मग तू काहीच करत नाहीयेस असं बोलून त्याला बाहेर काढतील. हा सगळा एडिटिंगचा खेळ मलाही माहीत आहे. त्यामुळे… व्होट फॉर प्रणित! जय महाराष्ट्र”

Bigg Boss 19
Bigg Boss 19 : अंकिता वालावलकरची प्रणित मोरेसाठी पोस्ट

यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवारने सुद्धा प्रणितला जास्तीत जास्त व्होट करा असं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. आता प्रणित येत्या काळात शोमध्ये कोणती स्ट्रॅटेजी वापरून त्याचा पुढील गेम खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.