Bigg Boss 19 Amaal Malik : लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता जवळपास ५० दिवस होऊन गेले आहेत आणि दिवसेंदिवस हा शो उत्कंठावर्धक होत आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनमधील स्पर्धक उत्तम आहेत, त्यामुळे या सीझनमध्ये कोण विजेता ठरेल याचा अंदाज लावणं प्रेक्षकांसाठीही कठीण झालं आहे.

स्पर्धा आणखी कठीण होत असतानाच शोमधून एकेक स्पर्धक बाहेर जात आहेत. आतापर्यंत एकूण तीन स्पर्धक ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी अभिनेता झीशान कादरी घरातून बाहेर पडला. त्यानंतर अजून एलिमिनेशन झालं नाही. मात्र, या आठवड्यात घरातील एका स्पर्धकाला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावं लागणार आहे.

या आठवड्यात प्रणीत मोरे, नेहल चुडासमा, गौरव खन्ना आणि बसीर अली यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. या चार जणांपैकी गायक अमाल घरातून बाहेर पडणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. BB Insider HQ या एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरून ट्विट करण्यात आलं, त्याच्या एलिमिनेशनसंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टमधून ‘बिग बॉस १९’मधून अमाल बाहेर पडू शकतो आणि त्यामागचं कारण त्याचं आरोग्य असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच अमालचे वडील डब्बू मलिक यांनी केलेल्या एका ट्विटमधूनही या चर्चेला आणखी जोर धरला आहे. डब्बू मलिक यांनी शुक्रवारी “बस्स झालं… आता पुरे… भेटूया २८ ऑक्टोबरला… संगीतच आमचं खरं ध्येय आहे”, अशी एक पोस्ट शेअर केली होती. यावरून अनेकांना वाटतंय की, अमाल खरोखरच शोमधून बाहेर पडणार आहे.

अमाल मलिकचे वडील डब्बू मलिक यांचं एक्सवरील पोस्ट

दरम्यान, अमाल हा ‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनचा संभाव्य विजेता मानला जात होता. शहबाज बरोबरची त्याची मैत्री आणि फरहाना भटबरोबर नुकतेच झालेले वाद या दोन्ही गोष्टींमुळे तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. अशातच आता त्याचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अमाल मलिकच्या एलिमिनेशन संदर्भातील एक्सवरील पोस्ट

BB Insider HQ वरील पोस्ट आणि डब्बू मलिक यांच्या एक्सवरील पोस्टमुळे अमाल ‘बिग बॉस १९’मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत. आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे? अमाल खरंच ‘बिग बॉस’मधून बाहेर पडणार का? ‘बिग बॉस’मधून बाहेर पडण्याचं नेमकं कारण आरोग्य आहे का? हे येत्या वीकेंड का वारमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.