Bigg Boss 19 Fame Abhishek Bajaj’s Ex Wife Statement : ‘बिग बॉस १९’ सध्या चर्चेत आहे. त्यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार, इन्फ्लुएन्सर यांनी सहभाग घेतला आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता अभिषेक बजाज. अभिषेक बजाज व अशनूर कौर यांची ‘बिग बॉस’च्या घरात मैत्री फुलताना दिसतेय. तर हे दोघे एकमेकांना पसंत करतात, असंही म्हटलं जात आहे. अशातच आता अभिषेकच्या एक्स पत्नीनं त्यांच्या नात्याबद्दल काही खुलासे केले आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिषेक बजाज व त्याच्या एक्स पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता त्याची एक्स पत्नी आकांक्षा जिंदालनं एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं अभिषेकबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. आकांक्षानं ती व अभिषेक एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखायचे, असं सांगितलं आहे.

विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षानं सांगितलं की, ते शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखायचे आणि लग्नापूर्वी त्यांनी सात वर्षं एकमेकांना डेट केलेलं. परंतु, या लग्नाला आकांक्षाचे कुटुंबीय आधी तयार नव्हते. मात्र, तिच्या आनंदासाठी त्यांनी सहमती दिली.

अभिषेक बजाजबद्दल एक्स पत्नीची प्रतिक्रिया

आकांक्षाला मुलाखतीत तुम्ही सात वर्षं डेट केलं, शाळेत असताना एकमेकांना ओळखायचा; मग असं काय झालं की, दीड वर्षातच तुमचं लग्न मोडलं, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “लग्नानंतर गोष्टी ३६० डिग्री बदलल्या, जे घडत होतं त्याचा स्वीकार करणं मला जमत नव्हतं. त्यानं विश्वासघात केला, त्याचं वागणं पाहून मला कळून चुकलेलं की, हा बदलणार नाहीये.” आकांक्षा पुढे म्हणाली, “त्यावेळी माझ्या कुटुंबानं मला खूप पाठिंबा दिला. त्याचे अनेक मुलींबरोबर संबंध होते. इंडस्ट्रीतील अनेकांनी मला त्याबद्दल सांगितलेलं.”

दरम्यान, अभिषेक बजाज हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आजवर ‘सिलसिला प्यार का’, ‘संतोषी माँ’, ‘दिल देके देखो’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो ‘बिग बॉस १९’मुळे चर्चेत आहे.