Bigg Boss 19 Fame Abhishek Bajaj’s Statement Against Ex Wife : अभिषेक बजाज हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या तो ‘बिग बॉस १९’मुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात त्याची व अभिनेत्री अशनूर कौरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे त्याची एक्स पत्नी आकांक्षा जिंदालने अलीकडेच त्याच्याबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया देत, त्याने फसवणूक केल्याचा दावा केला होता. अशातच आता अभिषेकने याबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिषेकबद्दल एक्स पत्नीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल सांगत त्यानं तिची फसवणूक केल्याचं म्हटलेलं. अशातच आता तिला अभिषेकनं प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेत्याच्या टीमने त्यानं ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधीच हे लिहून ठेवलं होतं कारण- त्याला याबद्दल अंदाज होता, असं म्हटलं आहे. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार अभिनेत्यानं ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या नोटमधून म्हटलं, “मला असं काहीतरी लिहावं लागेल हा विचार मी कधीच केला नव्हता. पण माझ्या टीमच्या सल्ल्यानुसार मला हे लिहिणं महत्त्वाचं वाटत आहे.”
अभिषेक बजाजची एक्स पत्नीबद्दल प्रतिक्रिया
पुढे त्यानं, “विशेषकरून यासाठी की, मी बिग बॉसच्या घरात असताना कोणीतरी माझ्या भूतकाळाविषयी बोलू नये म्हणून. अनेक वर्षांच्या शांततेनंतर आणि विभक्त झाल्यानंतर, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, तीच प्रसिद्धीसाठी भुकेली असलेली व्यक्ती आज प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझं नाव आणि मान-सन्मान खराब करण्याचा प्रयत्न करतेय हे पाहणं अतिशय वेदनादायक आहे.”
अभिषेक पुढे म्हणाला, “आयुष्यात घडलेल्या त्या प्रसंगानंतर मला पुन्हा नव्यानं उभं राहणं खूप कठीण गेलं. त्यासाठी खूप हिंमत लागते. पुन्हा नव्यानं स्वत:च्या अटींवर करिअर उभं करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मी आजवर प्रत्येक काम प्रामाणिकपणानं आणि मेहनतीनं केलं आहे. त्यामुळे जेव्हा कोणीतरी खूप खालच्या पातळीला जाऊन उगाच टीका करतात तेव्हा खूप वाईट वाटतं.”
अभिषेकने पुढे म्हटलं, “मी हात जोडून माध्यमांना आणि माझ्या चाहत्यांना विनंती करतो की, कोणाच्या तरी प्रतिमेला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना फार महत्त्व देऊ नका. विशेषकरून जेव्हा मी त्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण देण्यासाठी तिथे उपस्थित नसेन. मी आज खंबीरपणे उभा आहे ते तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे. तुमचं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे.”