Bigg Boss 19: बिग बॉसच्या १९ व्या पर्वाची काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये दररोज काहीतरी नवीन घडताना दिसते.

‘बिग बॉस १९’मध्ये गटबाजीला सुरुवात

प्रत्येक दिवशी घरातील सदस्यांमध्ये भांडणे होताना दिसतात, मैत्रीची व्याख्या बदलताना दिसते, शत्रू मित्र होतात, मित्र शत्रूसारखे वागतात. टास्कदरम्यान अनेकदा भांडणे होतात, ते टास्क जिंकण्यासाठी कधीकधी समोरच्याची फसवणूक केली जाते; तर काही जण सरळ मार्गाने जिंकण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यात कोणीतरी आपलेसे वाटते; इतर लोकांबद्दल मनात अनेक प्रश्न असतात.

सलमान खान प्रत्येक आठवड्याच्या शेवटी येऊन सदस्यांची शाळा घेतो. चुकलेल्यांना त्यांची चूक सांगतो, जे पातळी सोडून वागतात त्यांना रागावतो आणि बरोबर असलेल्यांना शाबासकी देतो. आता बिग बॉस १९ मध्येदेखील काही गट पडलेले दिसत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात तीन गट स्पष्टपणे दिसत आहेत.

अमाल मलिक व झीशान कादरी यांचा पहिला गट आहे. या गटात बसीर अली, फरहाना भट्ट, नेहल चुडासमा आणि मृदुल तिवारी यांचादेखील समावेश आहे. ते इतरांना भांडण्यासाठी प्रोत्साहन देतात. इतरांशी भांडणे काढतात.

दुसरा गट हा कुनिका, तान्या आणि नीलम गिरी यांचा आहे. या तिघी सतत एकत्र दिसतात. सीझन सुरू झाल्यापासून नीलम व तान्या एकत्र दिसतात. कॅप्टन्सी टास्कदरम्यान तान्याने कुनिकाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये कुनिका व तान्यामध्ये वादविवाद होताना दिसत आहेत.

तिसऱ्या गटात अशनूर कौर, प्रणीत मोरे, नगमा मिराजकर, अभिषेक बजाज, आवेज दरबार हे स्पर्धक दिसत आहेत, जे इतरांशी स्वत:हून भांडत नाहीत; ते शांतपणे त्यांचा खेळ खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच, गौरव खन्नाचादेखील खेळ प्रेक्षकांना आवडत आहे. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आठवड्याच्या शेवटी सलमान खान कोणाची शाळा घेणार, नेमके काय घडणार, स्पर्धकांची समीकरणे पुन्हा बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.