Nehal Chudasama Accuses Amaal Malik of Inappropriate Touch : ‘बिग बॉस म्हटलं की, राडे, भांडण, वादविवाद हे आलेच. अनेकदा टास्क खेळताना स्पर्धक जिंकण्यासाठी एकमेकांबरोबर झटापटी करतात आणि यावरून त्यांच्यात अनेकदा बाचाबाचीही होते. अर्थात हे फक्त त्या टास्कपुरतंच असतं. पण अनेकदा स्पर्धक आपल्याबरोबर हे मुद्दाम केलं गेल्याचंही म्हणतात. असंच काहीसं ‘बिग बॉस १९’च्या नुकत्याच भागात झालं.

‘बिग बॉस १९’च्या खेळाला आता कुठे रंगत आली आहे. ‘बिग बॉस’ सुरू होऊन घरातील स्पर्धकांचे एकमेकांबरोबर खटके उडायला सुरुवात झाली आहे. अशातच नुकत्याच एका टास्कमध्ये सर्वात मोठी लढाई पाहायला मिळाली. ‘बिग बॉस १९’च्या गुरुवारच्या भागात कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्पर्धक नेहल चुडासमाने रडायला सुरुवात केली आणि आरोप केला की, अमाल मलिकने तिला चुकीचा स्पर्श केला.

नेहल रडू लागल्यानंतर अमालला वाईट वाटलं आणि त्याने तिला अनेक वेळा माफी मागितली. काही वेळाने अमालसुद्धा भावुक झाला आणि रडू लागला. स्पर्धकांपैकी बरेच जण अमालच्या बाजूने उभे राहिले आणि म्हणाले की, अमालने काहीही चुकीचे केलेले नाही. दुसरीकडे, फरहाना भट्ट आणि बसीर अली हे नेहलला सावरत होते.

त्याचं झालं असं की, कॅप्टन्सीचा टास्कसाठी दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली. या टास्कमध्ये दोन्ही टीममधील फळ्यावर बराच वेळ लिहू शकतील असे एकेक सदस्य निवडण्यात आले. तर त्यांच्या विरोधात फळ्यावरील लिहीलेलं पुसण्यासाठीही सदस्य निवडण्यात आले.

या टीममध्ये बसीर अन् बजाज आणि अमाल अन् नेहल यांच्यात खेळ रंगला. यादरम्यान, अमालने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप नेहलने केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तशा प्रतिक्रियासुद्धा त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी नेहलवर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी तिला ‘Women Card’ वापरून चुकीचा नरेटीव्ह तयार करत असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल एका प्रेक्षकानं असं म्हटलं की, “अमाल काहीच करत नव्हता. पण नेहल रडायला लागली आणि त्याच्यावर चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला. अमालची चूक नसतानाही त्याने अनेकदा माफी मागितली. हे सगळं ‘स्ट्रॅटेजी’सारखं वाटतंय.”

आणखी एकाने म्हटलं, “उलट नेहलनेच अमालला चुकीचा स्पर्श केल्याचं स्पष्ट दिसत आहे. तरीही तिची हिंमत पाहा, त्याच्यावर आरोप करतेय. इतकी दुटप्पी वागणूक. लाजही नाही वाटत. आशा आहे लवकरच तिला घरातून बाहेर काढतील”. यापुढे एक नेटकरी असं म्हणतो, “टास्कदरम्यान अमालवर चुकीच्या स्पर्श झाल्याचा आरोप केला, पण प्रत्यक्षात अमालला त्रास दिला गेलाय. ‘बिग बॉस’ने जर खरंच हे चालून दिलं, तर हे अत्यंत लाजिरवाणं आहे.”

दरम्यान, याप्रकरणी आता ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान काय म्हणणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, काही वृत्तांनुसार सलमान खान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’च्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने या आठवड्यात तो शो होस्ट करणार नाही. त्याऐवजी फराह खान, अक्षय कुमार आणि अरशद वारसी हे ‘वीकेंड का वार’चे सूत्रसंचालन करणार आहेत.