Bigg Boss 19 Pranit More & Basi Ali fight : टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १९’मध्ये आता दिवसेंदिवस स्पर्धकांमधील घरात टिकून राहण्यासाठीची चुरस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होताना दिसतात. अशातच नुकत्याच झालेल्या भागातसुद्धा नवा वाद झाला. कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरातलं वातावरण चांगलंच तापलं.
‘गंदे डायनासोर’ नावाच्या टास्कमध्ये प्रणीत मोरे, बसीर अली व झीशान कादरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या टास्कमध्ये घरातील सदस्यांनी बागेतल्या पिंजऱ्यांमध्ये बसायचं होतं; तर एक सदस्य केअरटेकरच्या भूमिकेत होता. त्यात फरहाना भट्टने सुरुवात केली आणि मग बसीर अली व नीलम गिरी त्यात सहभागी झाल्या.
पुढे प्रणीत बोलायला लागल्यावर फरहाना भट्ट हिनं वारंवार टोमणे मारून त्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बसीर अली व नीलम गिरीही त्या वादात सामील झाले. बसीर प्रणीतला सतत चिडवत राहिला; पण प्रणीतनंही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रणीत बसीरवर टीका करताना म्हणाला, “तुलाच सगळ्यांत आधी घराबाहेर जावं लागणार आहे.” यावेळी त्यानं जुन्या घटनेचा उल्लेख करीत सांगितलं, “बसीरनं मला ‘गावी परत जा’, असं म्हटलं होतं. पण हे लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्रच माझं गाव आहे.”
त्यानंतर झीशान आणि प्रणीत यांच्यातील वादात बसीरनं प्रणीतला घराबाहेर काढणार असल्याची धमकी दिली. त्या वादात बसीरनं प्रणीतला थेट धमकी देत म्हटलं, “मी तुला घराबाहेर काढेन.” पण, प्रणीतनंही ठामपणे उत्तर देत असं म्हटलं, “मी तुझ्याआधी बाहेर जाणार नाही. कोणाचा गेम चांगला आहे, हे वेळच ठरवेल.”
दरम्यान, घरातील कॅप्टन्सीसाठीचा हा टास्क होता; पण या टास्कदरम्यान, स्पर्धकांनी अनेक जुने वाद उकरून काढले. तसंच एकमेकांशी वाद करताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील भांडणांचा उल्लेख केला. कॅप्टन्सीऐवजी लढण्याशिवाय वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप आणि जुन्या भांडणांवरूनच स्पर्धक एकमेकांशी भांडताना दिसले.