‘बिग बॉस १९’ मध्ये नुकतीच एन्ट्री केलेली मालती चहर अवघ्या काही दिवसांतच चर्चेत आली आहे. आपल्या खेळामुळे आणि थेट बोलण्यामुळे तिनं घरातली समीकरणंच बदलून टाकली आहेत. शोमध्ये येताच मालतीनं तान्या मित्तलवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. घरात आल्यापासूनच ती तान्यावर सतत टीका करताना दिसत आहे.
अशातच आता ‘कॅप्टन्सी टास्क’दरम्यान तान्या आणि मालती यांच्यात पुन्हा भांडण झालं. या टास्कमध्ये मालतीने तान्याच्या कुटुंबाबाबत अशी टिप्पणी केली की, यामुळे तान्याला अक्षरशः रडूच कोसळलं. एवढंच नाही, तर तिने थेट टास्कमधूनही माघार घेतली. याचाच एक प्रोमो समोर आला आहे.
मालती-तान्या यांच्यातील टास्कदरम्यान काय घडलं?
या टास्कदरम्यान, तान्या आणि मालतीला एका मोठ्या बुटात पाय घालून ‘पझल झोन’मध्ये जाऊन एक डिझाईन तयार करायचं आहे. याचवेळी मालती तान्याला म्हणते, “आधीच सांगते, तू काहीच करणार नाहीस.” त्यावर तान्या उत्तर देते, “नाही गं.. मी तर तसंही काही करत नाही… तुला तर मी आधीपासूनच घाबरून आहे!”. यादरम्यान प्रणीत तान्याला पाठिंबा देताना दिसतो. ‘Go For It’ असं म्हणत तो तान्याला प्रोत्साहन देतो.
पुढे मालती तान्याला म्हणते, “घराबाहेर गेल्यावर तुला समजेल की, आधीच थोडं कसं समजून घ्यायला हवं होतं.” त्यावर तान्या पुन्हा असं म्हणते, “मला काही समजून घ्यायची गरज नाही.” मग मालती असं म्हणते, “तुझ्या कुटुंबीयांना समजून घ्यावं लागेल.”
मालती पुढे म्हणते की, “मी म्हणून सांगत होते – गेम बदल. नाहीतर तुझ्या घरच्यांना वाईट वाटेल… तुझ्याबद्दलच्या काही गोष्टी बाहेर कळल्या तर तुझ्या घरच्यांना वाईट वाटेल ना… म्हणून सांगतेय.” मालतीच्या या बोलण्यामुळे तान्याला वाटतं आणि तिच्या कुटुंबाबद्दल ऐकताच तान्या माघार घेते आणि तिला म्हणते की, “जा, तूच जिंकली आहेस… बनव आता पझल.”
या टास्कनंतर तान्या मित्तल जोरजोरात रडू लागते. ती झीशान कादरीला म्हणते, “मी अजून स्ट्रॉंग होऊ शकत नाहीये… मला खूप वाईट वाटतंय.” त्यावर झीशान तिला समजाव म्हणतो, “तिच्या बोलण्याचा तुला त्रास होतोय, पण मी इतकं सांगूनही तुला काही कळत नाहीय. मालती खूप स्मार्ट पद्धतीने खेळतेय. तिनेच मला सांगितलंय की, तू एक स्ट्रॉंग प्लेयर आहेस.” यापुढे प्रोमो संपतो.
मालती चहर आणि तान्या मित्तल यांच्या भांडणाचा प्रोमो
दरम्यान, मालतीनं तानियाच्या कुटुंबीयांबद्दल नक्की काय टिप्पणी केली? हे आगामी भगात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसंच मालतीच्या वक्तव्यामुळे खचून गेलेली तानिया पुन्हा खंबीरपणे पुढचा टास्क खेळणार का? हेही आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.