छोट्या पडद्यावरील वादग्रस्त तरी तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदी ‘बिग बॉस’चं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि हा शो दिवसेंदिवस उत्कंठावर्धक वळणावर येत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात रोज होणारे वाद, बदलणारी नाती आणि नाट्यमय प्रसंग प्रेक्षकांना आवडत आहेत. अशातच आता या आठवड्यात दुसरा ‘वीकेंड का वार’ होणार असून, यामध्ये सलमान खान पुन्हा एकदा स्पर्धकांची झाडाझडती घेताना दिसणार आहे.

या आठवड्यात अमाल मलिक, अवेज दरबाज, मृदुल तिवारी, कुनिका सदानंद आणि तान्या मित्तल हे पाच स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामुळे यांपैकी शोमधून कोण बाहेर जाणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. पण याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एलिमिनेशनबाबत मोठी अपडेट

‘बिग बॉस १९’ सुरू होऊन दोन आठवडे झाले असले, तरी अद्याप कोणताही स्पर्धक घराबाहेर गेलेला नाही. मागच्या आठवड्यातही कुणी एलिमिनेट झालं नव्हतं. अशातच जनसत्ताच्या वृत्तानुसार, आठवड्यातसुद्धा एलिमिनेशन होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. ‘बिग बॉस ताजा खबर’ या इन्स्टाग्राम पेजच्या माहितीनुसार, दुसऱ्या आठवड्यातही सर्व स्पर्धकांना आणखी एक संधी दिली जाणार आहे.

तसंच शोमध्ये पहिल्या वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचंही म्हटलं जातंय. काही वृत्तांनुसार, अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज हा पहिला वाइल्ड कार्ड स्पर्धक असू शकतो. मात्र, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आता ‘वीकेंड का वार’ची वाट पाहावी लागणार आहे.

वाद, आरडाओरड आणि धमक्या

शुक्रवारच्या (५ सप्टेंबर) एपिसोडमध्येही खाण्यावरून मोठा गोंधळ झाला. कुनिका सदानंदने जीशान कादरीच्या ताटातील अन्न परत घेतलं आणि त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. यामध्ये इतर काही सदस्यही सामील झाले आणि त्यांच्यातही बाचाबाची झाली.

या एपिसोडमध्ये आणखी एक मोठा वाद बघायला मिळाला. या वादाची सुरुवात नेहल चुडासमाने केली. तिचं म्हणणं होतं की, अभिषेक बजाजने फरहाना भट्टला उचलल्यावर, तिची मैत्रीण असलेल्या अशनूरने त्याला विरोध केला पाहिजे होता. तसंच, इतर घरच्यांनीही अभिषेकला सुनावलं पाहिजे होतं. नेहलचं बोलणं ऐकून अशनूर भडकली आणि तिने मोठ्याने आरडाओरड करत नेहलवर ओरडायला सुरुवात केली. तसंच तिने धमक्याही दिल्या.