Bigg Boss 19 Pranit More Re-entry : ‘बिग बॉस १९’ हा शो सुरू होऊन आता ७० हून अधिक दिवस झाले आहेत. शोमध्ये आलेल्या स्पर्धकांपैकी काहींचा प्रवास संपला आहे, तर उर्वरित स्पर्धक घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशातच गेल्या आठवड्यात मराठमोळ्या प्रणित मोरेचा घरातील प्रवास संपला.

प्रकृतीच्या कारणास्तव प्रणितला या घरातून बाहेर पडावं लागलं. प्रणित बाहेर पडल्यानंतर मालती चहर, गौरव खन्ना, मृदुल तिवारी, कुनिका सदानंद आणि नीलम गिरी यांनी दु:ख व्यक्त केलं. इतकंच नव्हे, तर अनेक चाहत्यांनाही त्याचं असं अचानक बाहेर पडणं जिव्हारी लागलं आहे.

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांकडूनही तो शोमध्ये परत यावा, अशी मागणी सतत केली जात आहे. सोशल मीडियावर प्रणितचे अनेक चाहते त्याच्याशिवाय ‘बिग बॉस’ बघायला मजा येत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत. काही जण त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हणत होते. मात्र, शोमध्ये अद्याप त्याला दाखवण्यात आलेलं नाही. अशातच आता तो शोमध्ये परत येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर Bigg Boss Tak या पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमधून प्रणित पुन्हा शोमध्ये येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आजच्या भागात तो शोमध्ये दिसणार आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमुळे प्रणितच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पोस्टखालील कमेंट्समध्ये अनेकांनी त्याच्या कमबॅकबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

“Oh My God… खरंच का? विश्वास बसत नाहीये”, “प्रणित घरात परत येतोय ही बातमी ऐकून खूपच आनंद झालाय”, “शेवटी शोचा खरा विजेता घरात परतणार”, “आता खरी धमाल येणार”, “भाऊ इज बॅक” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. प्रणित परत येण्याचा आनंद चाहत्यांसह मालती, गौरव, मृदुल यांनाही नक्कीच होईल…

दरम्यान, ‘बिग बॉस’मधील प्रणितच्या परत येण्याबद्दल अद्याप शोच्या मेकर्सकडून किंवा वाहिनीकडून कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आज किंवा उद्याच्या भागात प्रणित येणार असल्याचं या पोस्टमधून म्हटलं गेलं आहे, त्यामुळे आजच्या भागात तो खरंच परतणार का? परत आला तर त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना आजच्या भागात मिळतील. यासाठी प्रणितच्या चाहत्यांना आजच्या भागाची उत्सुकता लागून राहिली असेल हे नक्की…