Malti Chahar Fights With Mridul Tiwari : ‘बिग बॉस १९’च्या या आठवड्यात एका नव्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहरने या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली आहे आणि घरात येताच तिनं आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. घरात येताच तिनं नुकत्याच एका टास्कमध्ये तानिया मित्तलला धडा शिकवला.

टास्कदरम्यान मालतीनं तानियाला थेट स्विमिंग पूलमध्ये ढकललं होतं, ज्यामुळे तानिया रडलीसुद्धा होती; पण मालतीनं मात्र तिच्यावर अजिबातच दया दाखवली नाही. तसंच तिनं तानियाची खोटी बाजू समोर आणल्याचंही घरातील इतर स्पर्धकांना सांगितलं होतं. तानियाबरोबरच्या वादानंतर आता मालती आणि मृदुल तिवारी यांच्यात जोरदार वाद होणार आहे.

‘बिग बॉस’चा शो सुरू झाल्यापासून मृदुलचा खेळ दिसत नव्हता, ज्याबद्दल गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खाननं त्याला खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता. सलमानचा हाच सल्ला मृदुलनं मनावर घेतला आहे. तो आता प्रत्येक खेळात स्वत:ची मतं व्यक्त करीत आहे, तसंच तो स्पष्टपणे आपली बाजूही मांडत आहे. इतके दिवस शांत दिसणाऱ्या मृदुलचा आक्रमकपणा समोर आला आहे.

‘बिग बॉस’च्या नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये मृदुल आणि मालती यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये मृदुल तिला म्हणतो, “मी आतापर्यंत कुणाला काही बोललो नाहीय”. त्याला मधेच थांबवत मालती म्हणते, “पागल आहेस काय? जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा शांत बसलास आणि आता बोलतोयस.” हे वाक्य ऐकताच मृदुलचा संयम सुटतो आणि तो म्हणतो, “माझ्या मनात आलं की, इतकी वाईट शिवी देऊ की, हिला लाज वाटेल!”

पुढे वाद आणखीनच पेटल्यावर मालती “चल हट…” म्हणत तिथून उठून निघून जाते; पण मृदुल तरीही थांबत नाही. तोही तिला ओरडून म्हणतो, “अरे ओ! हट! तुला एका मिनिटात भूत बनवीन”. त्यावर मालतीही शांत बसत नाही. ती म्हणते, “तू खरंच पागल आहेस!” त्यावर मृदुलही तिला सुनवतो की, “हो! आहे मी पागल. तुझ्यासारखे ५० पागल एका मिनिटात फेकून देईन!” त्यानंतर मालती त्याला चिडून “तू इकडून निघून जा”, असं म्हणते. त्यावर मृदुलही तिला “नाही! मी नाही जाणार”, असं ठणकावून सांगतो.

मालती चहर आणि मृदुल तिवारी यांच्यातील भांडणाचा प्रोमो

दरम्यान, मृदुल आणि मालती यांच्यातील हा वाद नक्की कोणत्या कारणावरून झाला आहे, हे अजून समोर आलेलं नाही. एखाद्या टास्कवरून त्यांच्यात हा वाद झाला असावा. आजच्या भागात या वादाचं नेमकं कारण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनेक आठवड्यांनी मृदुलनं त्याचा हा आक्रमकपणा दाखवल्याबद्दल चाहते या प्रोमोखाली आनंद व्यक्त करीत आहेत. तसंच त्याला असाच खेळ कायम टिकवून ठेवण्यासाठी शुभेच्छाही देत आहेत.