Bigg Boss च्या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक शोचा भाग असताना तर चर्चेत असतातच. मात्र, त्या शोमधून बाहेर पडल्यानंतरदेखील त्यांची चर्चा होताना दिसते. या शोचा भाग असताना स्पर्धकांमध्ये अनेक भांडणे, वादविवाद होताना दिसतात. कधी त्यांच्यातील हे वाद तिथेच मिटतात, तर कधी शोनंतरही त्याचे पडसाद पाहायला मिळतात.
आता ‘बिग बॉस मराठी ५’वा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, या पर्वात घडलेल्या अनेक घटना प्रेक्षकांना अनेक दिवस लक्षात राहणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जान्हवीने पंढरीनाथ कांबळेची खिल्ली उडवीत केलेला अपमान आहे. आता पंढरीनाथ कांबळेने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला पंढरीनाथ कांबळे?
‘बिग बॉस मराठी ५’मधून बाहेर पडलेल्या पंढरीनाथ कांबळेने ‘कलाकट्टा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीबद्दल बोलताना त्याने म्हटले, “जान्हवीबरोबर मी काम करेन; पण ती जी गोष्ट बोलली, ती कायम डोक्यात राहील. मी त्याचा बदला नाही घेणार; पण ती गोष्ट डोक्यात राहील.”
पुढे बोलताना पंढरीनाथ कांबळेने म्हटले, “एक तर ते जे झालं, ते माझ्यासमोर झालं नाही. ती बाहेर गार्डन परिसरात होती आणि आम्ही लिव्हिंग एरियामध्ये बसलो होतो. तेव्हा आर्यानं ते ऐकलं होतं. तर ती जान्हवीबरोबर भांडत होती. मी आर्याला बोलावलं आणि विचारलं काय झालं. तर ती मला बोलली, “दादा, ती तुमच्या करिअरबद्दल बोलतेय. तुम्ही ओव्हर अॅक्टर आहात, ओव्हर अॅक्टिंग करता, असं ती म्हणतेय.” मी म्हटलं, तू शांत हो. तिला शांत केलं; पण काही गोष्टी मनाला लागतात. त्यावेळी मी म्हटलेलं की, देव करो आणि ती खूप मोठी अभिनेत्री होऊ दे आणि तिला माझ्याबरोबर काम करण्याचा योग आला, तर तिला निर्णय घेता येऊ दे की, मला या माणसाबरोबर काम करायचं नाही किंवा देवानं मला इतकं मोठं बनवू दे की, मला तिच्याबरोबर काम करायचं नाही, असं मी म्हणू शकेन.”
“रागात बोललो मी तिथे; पण नंतर मलाच वाईट वाटलं. कारण- तिला शिक्षा झाली नंतर आणि ती जेलमध्ये गेली. आपल्यामुळे तिला शिक्षा दिली, असं वाटलं. मी तिच्याबरोबर काम करीन. मी तिला माफ केलंय; पण त्या गोष्टी लक्षात राहतील”, असे पंढरीनाथ कांबळेने म्हटले आहे.
दरम्यान, जान्हवी किल्लेकरने, तो आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करीत आहे, असे म्हणत पंढरीनाथ कांबळेच्या अभिनयाची खिल्ली उडवली होती. त्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पंढरीनाथला पाठिंबा देत जान्हवीला खडे बोल सुनावले होते. नंतर जान्हवीने तिच्या त्या वक्तव्यासाठी पंढरीनाथची माफीही मागितली होती. भाऊच्या धक्क्यावर तिला तिच्या या चुकीच्या वागण्याची शिक्षा मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. आता पंढरीनाथ कांबळेने तिला माफ केले असले तरी तिचे वक्तव्य लक्षात राहील, असे त्याने म्हटले आहे.