छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणून बिग बॉस या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व होऊन अवघे १५ दिवस उलटले आहे. मात्र पहिल्या दिवसापासूनच या कार्यक्रमात गॉसिप, भांडण आणि राडे पाहायला मिळाले. त्यामुळे पहिल्याच दिवसांपासून या शो ची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. पण यंदा बिग बॉसचे पर्व गाजण्यामागचे कारण म्हणजे अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे. बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्यात वाद पाहायला मिळत आहे.

बिग बॉसने दिलेले टास्क, टीम, नॉमिनेशन यातील प्रत्येक गोष्टीत त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडताना पाहायला मिळत आहे. सध्या ते दोघेही एकमेकांशी जुळवून घेत असल्याचे पाहायला मिळत असलं तरीही त्यांच्यातील धुसफूस काही संपलेली दिसत नाही. मात्र त्या दोघांमध्ये इतके वाद का होतात, यामागचे कारण काय याचा नुकतंच खुलासा झाला आहे. अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात बोलताना याबद्दलचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

अपूर्वा आणि प्रसाद गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. पण एकदा प्रसादने अपूर्वाला वाईट आणि चुकीची वागणूक दिली होती. त्यामुळेच त्या दोघांमध्ये सतत वाद पाहायला मिळत आहे. त्यावेळी ती म्हणाली, “मी पहिल्या दिवशी जेव्हा प्रसादला बिग बॉसच्या घरात पाहिले, तेव्हाच माझं डोकं तापलं होतं. कारण एकदा मी माझ्या पहिल्या मालिकेच्या ऑडिशनसाठी गेले होते. तो सेट प्रसादचा होता. तेव्हा मला बघताच त्याने तोंड वाकडं केले. मी त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले होते.”

“त्यानंतर माझा या क्षेत्राशी संबंध नसताना एक मालिका मिळाली. ती मालिका जवळपास दीड वर्ष सुरु होती. त्यानंतर ती संपली. यानंतर एकदा सहज प्रसाद आणि माझी चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. त्यावेळी मी सेटवर फार लाइट मेकअप करुन गेली होती. यावेळी या चित्रपटातील एक रोमँटिक दृश्य शिवाजी पार्क चौपाटीवर शूट होणार होते. तेव्हा प्रसादने मला पाहिलं आणि त्याला वाटलं मी सहज फेरफटका मारण्यासाठी तिथे आली आहे.

यावेळी मी त्या चित्रपटाच्या महिला दिग्दर्शिकेबरोबर उभी होती. त्यावेळी तिथे प्रसाद आला आणि मला म्हणाला, काय एक मालिका करुन संपलं का? … आता लग्न करायचं आणि नवरा पोरांना घेऊन ७.३० वाजता माझी मालिका बघायची. त्यावेळी मी त्याच्याकडे बघितले पण काहीही बोलले नाही.

कारण त्याची मालिका ज्या वाहिनीवर झळकत होती तिची वेळ ७.३० ची होती आणि त्याच वेळेत अवघ्या १५ दिवसांनी माझी मालिका सुरु होणार होती. त्यात मी प्रमुख भूमिका करते याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्या स्लॉटला माझी मालिका लागणार याबद्दल त्याला जेव्हा समजले आणि त्याने मला लगेचच फोन केला. त्यावेळी मी त्याला म्हणाली, आता तुझं वाइन्ड अप होईल, त्यामुळे आता तू लग्न कर आणि बायका पोरांना घेऊन ७.३० वाजता माझी मालिका बघ”, असे तिने हा किस्सा सांगतेवेळी म्हटले.

तिने सांगितलेला हा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही गोष्ट नक्की कोणत्या वर्षात घडली, कोणत्या मालिकेदरम्यान घडली याचा अपूर्वाने उल्लेख केलेला नाही. मात्र यामुळे प्रसाद आणि अपूर्वामध्ये ३६ चा आकडा असल्याचे पाहायला मिळत आहे.