Suraj Chavan New Home Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी नुकतीच अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. नुकतीच अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी पोहोचली होती. यामागे एक कारण होतं, ते म्हणजे सूरजचं लग्न ठरलंय आणि अंकिताला लग्नाला उपस्थित राहणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणीने आधीच जाऊन भावाची भेट घेतली आहे.

अंकिताने सूरजचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. याचबरोबर भावाच्या गावी गेल्यावर अंकिता सर्वप्रथम त्याचं नवीन घर पाहण्यासाठी गेली होती.

सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देईन असा शब्द दिला. यानंतर सूरजच्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. अजित पवार यांनी स्वत: सूरजच्या घराचं बांधकाम कसं चालूये याची पाहणी केली होती. आता ‘गुलीगत किंग’चं ड्रीम होम लवकरच पूर्णत्वास येणार आहे आणि सूरज या नव्या घरात त्याच्या पत्नीचं धुमधडाक्यात स्वागत करणार आहे.

सूरजने अंकिताला त्याचं संपूर्ण घर दाखवलं. अजूनही पायऱ्याचं काम आणि नव्या बंगल्यातील अनेक कामं पूर्ण झालेली नाहीत. बांधकाम पूर्ण झाल्यावर सूरज आपल्या ड्रीम होममध्ये गृहप्रवेश करेल.

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी घराविषयी संवाद साधताना सूरज म्हणाला होता, “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी ( अजित पवार ) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” आता सूरज लग्न केव्हा करणार आणि त्याच्या नव्या घरात केव्हा एन्ट्री घेणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सूरज चव्हाणच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. बालपणी आई-बाबांचं छत्र हरपल्यामुळे त्याच्या बहि‍णींनी त्याचा सांभाळ केला. यानंतर सोशल मीडिया रील्समुळे सूरज घराघरांत लोकप्रिय झाला. पण, त्याचं खरं नशीब ‘बिग बॉस’मुळे बदललं. यामुळेच, आपल्या हक्काच्या घराला सूरज Bigg Boss हे नाव देणार आहे असं त्याने शो संपल्यावरच स्पष्ट केलं होतं.