Suraj Chavan Soon To Get Married : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर दाक्षिणात्य लूक करून एका मुलीसह फोटो शेअर केला होता. यानंतर त्याच्या लग्नाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. अनेकांनी हे लग्न नसून सूरजचा नवीन प्रोजेक्ट येत असेल असाही अंदाज कमेंट्स सेक्शनमध्ये वर्तवला होता. मात्र, सूरजच्या जवळच्या नातेवाईकांनी या फोटोवर कमेंट्स करत, ‘ही बातमी खरी आहे, तुम्ही त्याचं अभिनंदन करा’ असं आधीच म्हटलं होतं. तरीही चाहत्यांच्या मनात, “सूरजचं खरंच लग्न ठरलंय का?” याबद्दल शंका होती.
अखेर, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे सूरजचं लग्न ठरल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. ‘बिग बॉस’पासून अंकिता व सूरज यांच्यात खूप छान बॉण्डिंग तयार झालं होतं. शोमध्ये अंकिताने सूरजला आपला भाऊ मानलं होतं. हे भावा-बहिणीचं नातं या दोघांनी शो संपल्यावर सुद्धा कायम जपलं आहे.
अंकिता नुकतीच सूरजच्या गावी गेली होती. याठिकाणी त्याच्या ‘ड्रीम होम’चं काम कसं सुरू आहे हे तिने आवर्जून पाहिलं. यानंतर अंकिताने सूरजच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीची भेट घेतली आहे आणि आपल्या लाडक्या भावाचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली.
अंकिताने सूरजच्या होणाऱ्या पत्नीसह फोटो शेअर करत या फोटोच्या कॅप्शनमध्ये, “सूरजला खूप खूप शुभेच्छा…लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही सदिच्छा भेट” असं लिहिलं आहे आणि सूरजच्या पत्नीचा चेहरा सध्या रिव्हिल करायचा नसल्याने तिच्या चेहऱ्यावर लव्ह इमोजी लावला आहे. लवकरच होणाऱ्या पत्नीबद्दल सूरज स्वत: तुम्हाला सांगेल असंही अंकिताने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आता सूरजचं लग्न केव्हा असणार, त्याची होणारी पत्नी नेमकी कोण आहे? याची सगळे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अंकिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत सूरजच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.