Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम गेली वर्षानुवर्षे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच हा शो आधीपेक्षा एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, यंदा शोमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे, डॉ. निलेश साबळेऐवजी यंदा अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘चला हवा येऊ द्या’चा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. याचबरोबर प्रेक्षक एका खास अभिनेत्याला या शोमध्ये मिस करत आहेत त्यांचं नाव आहे भाऊ कदम.

गेली अनेक वर्षे विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून भाऊ कदम यांना ओळखलं जातं. सलग १० वर्षं ते ‘चला हवा येऊ द्या’ या टीमचा एक महत्त्वपूर्ण भाग होते. मात्र, एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने ते यावर्षी शोमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.

भाऊ कदम यांना पहिल्या दिवसापासून प्रेक्षक मिस करत आहेत. अगदी ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रोमोवर सुद्धा भाऊ कदम यांच्याविषयीच्या कमेंट्स येत असतात. अखेर ‘चला हवा येऊ द्या’ची टीम आणि भाऊ कदम यांची भेट झालेली आहे. या भेटी दरम्यानचे फोटो अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

“…आणि भाऊ कदम आलेले आहेत…कार्यक्रम दणक्यात पार पडलाय” असं कॅप्शन कुशलने या फोटोला दिलं आहे. मात्र, भाऊ कदम नेमके ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आले होते की हा कोणता वेगळाच कार्यक्रम आहे याचा उल्लेख कुशलने पोस्टमध्ये केलेला नाही.

कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, अंकुर वाढवे या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “भाई… भाऊ कदम आणि गौरव मोरे एकाच शोमध्ये आले तर खतरनाक होईल”, “ही खरी ‘चला हवा येऊ द्या’ची ड्रीम टीम आहे”, “मस्त फोटो” अशा प्रतिक्रिया या फोटोवर आल्या आहेत.

दरम्यान, आता भाऊ कदम आणि ‘चला हवा येऊ द्या’चे कलाकार एकत्र का भेटले होते हे जाणून घेण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत. भाऊ कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या काही दिवसांपासून ‘प्रेमाची गोष्ट २’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ते व्यग्र आहेत. त्यांच्यासह या सिनेमात ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी, रिद्धिमा पंडित, रुचा वैद्य या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.