Chala Hawa Yeu Dya Actor Ankur Wadhave : ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम गेली १० वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे असे अनेक कलाकार या कार्यक्रमामुळे चर्चेत आले. याच शोमुळे अभिनेता अंकुर वाढवे देखील प्रसिद्धीझोतात आला.

अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर अंकुरने गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंकुर वाढवे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. २८ जून २०१९ रोजी अंकुरचा विवाह पार पडला होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली. २०२१ मध्ये अंकुरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं.

आता नुकताच अंकुरला मुलगा झाला असून, अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. फेसबूकवर फोटो शेअर करत अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. फोटोमध्ये अंकुरने आपल्या गोंडस बाळाचा चिमुकला हात हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. “दुसऱ्यांदा बाबा झालो यावेळी मुलगा झाला” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, अंकुरने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अंकुर ‘चला हवा येऊ द्या’मुळे घराघरांत पोहोचला. ‘पुढं त्याने गेलो गाव’, ‘गाढवाचं लग्न’, ‘सर्किट हाऊस’, ‘आम्ही सारे फर्स्ट क्लास’, ‘सायलेन्स’, ‘कन्हैय्या’ यांसारख्या नाटकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्याने काम केलं होतं. याशिवाय अंकुर उत्तम कवी देखील आहे.