Marathi Actress Ruchira Jadhav Post : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळाली, मात्र यामधल्या काही दृश्यांबाबत शिवप्रेमींनी नाराजी दर्शवली होती. राजकीय वर्तुळातून सुद्धा महाराज लेझीम खेळतानाच्या दृश्यावर प्रतिक्रिया येत होत्या. अखेर सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधताना लेझीमचा सीन चित्रपटातून वगळण्यात येईल असं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांना सांगितलं.

ट्रेलर प्रदर्शित होताच हा सिनेमा लेझीम सीन आणि काही संवादांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, यावर आता दिग्दर्शकांनी आपली भूमिका स्पष्ट करत इतिहासकारांना दाखवून त्यानंतर ‘छावा’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल असं मत मांडलं आहे. यावर आता मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

‘बिग बॉस मराठी’ तसेच छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुचिरा जाधवने ‘छावा’च्या वादावर आपलं स्पष्ट मत मांडत, इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. रुचिराची ही पोस्ट आता सर्वत्र चर्चेत आली आहे.

“Ohh… मला आवडलं असतं, माझ्या राजाला नवीन रुपात बघायला, ज्यांनी स्वत:च्या कारकि‍र्दीत एवढं सगळं झेललं. त्यांना त्यांचा आनंद… ‘परंपरा जपत’ साजरं करताना बघायला नक्कीच आवडलं असतं. सिनेमा is an Art. मुळात अशी दृष्य दाखवण्यामागचा हेतू समजून न घेता, चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं हे किती योग्य आहे? खरंतर अशा लोकांचा रादर त्यांच्या वृत्तीचा हेतू चेक केला पाहिजे.” असं स्पष्ट मत अभिनेत्रीने या पोस्टद्वारे मांडलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Marathi Actress Ruchira Jadhav Post
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवची छावा चित्रपटाबद्दल पोस्ट ( Marathi Actress Ruchira Jadhav Post )

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत असून, महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारणार आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकार सुद्धा यामध्ये झळकणार आहेत.