Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामधल्या नृत्याच्या सीनवर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह शिवप्रेमींनी आक्षेप घेतला होता. अखेर आता हा सीन सिनेमातून हटवण्यात येणार आहे.

‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यासंदर्भात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासातील जाणकारांना दाखवणार का? याबाबत दिग्दर्शक म्हणाले, “शिवप्रेमींच्या भावना जर दुखावणार असतील तर, तो ट्रेलरमध्ये दाखवलेला लेझीमचा सीन हा महाराजांपेक्षा मोठा नाहीये. तो आम्ही नक्की डिलीट करू. शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आहे त्यावर हा सिनेमा आधारित आहे. इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत, त्यामुळे ‘छावा’ कादंबरीचे अधिकृत हक्क घेऊनच आम्ही हा सिनेमा बनवला आहे. बाकी इतर कोणताही कट नसेल, फक्त ते लेझीमचं दृश्य हटवलं जाईल.”

“आमचा चित्रपट १४ फेब्रुवारीलाच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासातील जाणकार, तज्ज्ञ मंडळींना चित्रपट दाखवला जाईल. त्यांच्याबरोबर आम्ही प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू. त्यानंतर ‘छावा’ प्रदर्शित होईल. यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाहीये. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण जगासमोर यावी हाच एकमेव उद्देश यामागे आहे.” असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी ‘छावा’ सिनेमाच्या वादाबाबत उदयनराजे भोसले यांनी देखील चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यांनी देखील, संबंधित सीनमध्ये इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन आवश्यक बदल केल्यास कॉन्ट्रोव्हर्सी होतेय ती संपेल असं लक्ष्मण उतेकरांना सांगितलं होतं. याशिवाय राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी देखील “हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये” अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळे आता प्रदर्शनाआधी हा सिनेमा इतिहासकारांना दाखवण्याचा निर्णय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी घेतला आहे. तसेच लेझीमचा सीन सुद्धा सिनेमातून हटवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारणार आहे. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना साकारेल.