‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय मालिका ठरली होती. या मालिकेतून प्रार्थना बेहेरे व श्रेयस तळपदे यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. याचबरोबर या मालिकेतून मायरा वायकुळने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. तिचा निरागसपणा प्रेक्षकांना भावला. आता मायरा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी मालिकेत काम केल्यावर मायरा आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार आहे. ‘नीरजा- एक नई पहचान’ असं या तिच्या मालिकेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला होता. त्यात मायराची झलक दिसली. आता त्यापाठोपाठ मालिकेचा दुसरा प्रोमो समोर आला असून यात मायराचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : Video: परीच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेची खास पोस्ट, म्हणाली, “मला तू…”
या नवीन मालिकेत मायरा नीरजा नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. मायरा बंगाली पद्धतीची साडी नेसून कालीमातेची आरती करीत असताना एक व्यक्ती तिच्यावर नजर ठेवत असल्याचं तिच्या लक्षात येतं आणि ती बंगालीमध्ये एक ते दहा अंक म्हणते. दहा अंक पूर्ण होताच ती तिथून पळ काढते आणि थेट घरी जाते. तिथे तिला भेटलेल्या एका बाईला ती म्हणते, “माझ्या आईने मला सांगितलं आहे की, दहा अंक पूर्ण होईपर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्याकडे बघत असेल तर तिथून पळून जायचं.” त्यावर ती बाई मायराला म्हणते, “आमची नीरजा इतकी सुंदर दिसते तर लोक तिच्याकडे बघणारच.” इतक्यात तिची आई तिथे येते आणि तिला घेऊन जाते. आपल्या मुलीला कुठल्याही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागू नये म्हणून ती मायराचे केस कापते, असं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आता तिचा हा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यावर कमेंट करीत नेटकरी तिच्या अभिनय कौशल्याचं, तिच्या बंगाली बोलण्याचं कौतुक करत आहेत. मायराची ही नवी मालिका लवकरच ‘कलर्स’वर सुरू होणार आहे