Chinmayi Sripaada post about KBC contestant Ishit Bhatt : ‘ज्युनियर कौन बनेगा करोडपती’ हा शो सध्या सगळीकडे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे हॉटसीटवर बसलेल्या इशित भट्टने होस्ट अमिताभ बच्चन यांना उद्धटपणे दिलेली उत्तरं होय. अतिआत्मविश्वास असलेला इशित शोमध्ये पैसे जिंकू शकला नाही, पण त्याने दिलेल्या उत्तरांमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
केबीसीमधील एक व्हिडीओ एक्स व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या एपिसोडमध्ये इशित भट्ट नावाचा पाचवीतला मुलगा अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसलेला आहे. त्याचं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं वागणं पाहून, तसेच त्याने दिलेली उत्तरं पाहून नेटकरी त्याला उद्धट म्हणत आहेत. या मुलाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. इशित भट्टला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय, त्यावर लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिने पोस्ट केली आहे. प्रौढ लोक ज्या पद्धतीने एका लहान मुलाला ऑनलाइन ट्रोल करत आहेत, ते पाहून चिन्मयीने नाराजी व्यक्त केली आहे.
चिन्मयी श्रीपदाने एक्सवर एक पोस्ट केली. त्यात इशितचा फोटो आणि ‘The most hated kid on the internet’ असं कॅप्शन असलेली एक पोस्ट चिन्मयीने एक्सवर रिशेअर केली. ही पोस्ट करत चिन्मयीने लिहिलं, “एका प्रौढ व्यक्तीने ट्विट करत म्हटलं की हा इंटरनेटवरील मोस्ट हेटेड मुलगा आहे. ट्विटरवरील प्रौढ हे सर्वात वाईट, घाण बोलणारे, शिवीगाळ करणारे लोक आहेत; कफ सिरपमुळे मुलं मरण पावली तेव्हा यापैकी कोणीही काहीही बोललं नाही. पण हो, एका मुलाला लक्ष्य करत आहेत. हे सगळं इकोसिस्टिमबद्दल बरंच काही सांगतं. सर्व लोक एका अतिउत्साही मुलाला लक्ष्य करतायत, पण हे लोक स्वतः किती भयंकर गुंडांसारखे आहेत.”
इशित भट्टचं प्रकरण नेमकं काय?
एका एपिसोडच्या सुरुवातीला, इशित भट्ट हॉट सीटवर बसतो. अमिताभ बच्चन त्याला तिथे बसून कसं वाटतं ते विचारतात. त्यावर इशित म्हणतो, “मी खूप एक्सायटेड आहे, पण सर थेट मुद्द्यावर येऊया. मला नियम माहित आहेत, मला नियम समजावत बसू नका.” यावर, बच्चन हसतात आणि खेळ सुरू करतात. इशित भट्ट पहिल्या काही प्रश्नांची उत्तरे पटकन देतो, परंतु पाचव्या प्रश्नावर त्याचा अति आत्मविश्वास त्याला नडतो.
पाचवा प्रश्न रामायणाशी संबंधित होता. वाल्मिक रामायणाच्या पहिलं कांड कुठलं आहे? हे विचारताच इशित भट्ट ऑप्शन्स असं म्हणाला. ज्यावर सगळे हसले. मग बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड, किष्किंधा कांड असे पर्याय देण्यात आले. इशितने त्यापैकी अयोध्याकांड हा पर्याय निवडला. पण त्याचं उत्तर चुकलं. या प्रश्नाचं खरं उत्तर बालकांड आहे.
उत्तर चुकल्यानंतर इशित भट्ट रडू लागला आणि म्हणाला, “मला आता फोटो मिळणार नाही.” मग अमिताभ बच्चन यांनी त्याला शांत केलं. त्याला मिठी मारली आणि त्याचे सांत्वन केले.