Maharashtrachi Hasyajatra Fame Samir Choughule & CM Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या शोचे चाहते आहेत. बॉलीवूड कलाकारांपासून ते क्रिकेटच्या खेळाडुपर्यंत अनेकजण हा कार्यक्रम आवर्जून पाहतात. जवळपास ७ ते ८ वर्षे हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेते समीर चौघुले यांना हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयाबरोबच ते उत्तम लेखक म्हणून देखील ओळखले जातात. बहुतांश प्रेक्षक खास समीर चौघुलेंसाठी हास्यजत्रा पाहतात.

समीर चौघुलेंनी नुकतीच ‘सोनी मराठी’च्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हास्यजत्रा पाहतात याबद्दलचा एक खास किस्सा सांगितला. हास्यजत्रेच्या कलाकारांना मुख्यमंत्री काही वर्षांपूर्वी विमान प्रवासादरम्यान भेटले होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा हास्यजत्रेच्या कलाकारांचं कौतुक करतात…

समीर चौघुले सांगतात, “आम्हाला विमानात फडणवीस साहेब भेटले. त्यांना आम्ही सगळे भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला बोलावलं म्हणाले, ‘चौघुले या जरा इथे या! दोन मिनिटं थांब हा जरा…’ मी जरा दचकलो की साहेब आता काय दाखवणार. त्यांनी स्वत:चा फोन काढला आणि मला मोबाइल दाखवत म्हणाले, ही बघा…तुम्हाला टाइमलाइन दिसतेय का? सगळे हास्यजत्रेचे एपिसोड आहेत. आम्ही फक्त तुमचे एपिसोड्स बघत असतो. ही गोष्ट ऐकून त्यावेळी खरंच खूप छान वाटलं”

१९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या क्रिकेट टीमच्या ग्रुपवर…

पुढे, अमित फाळके आणखी एक किस्सा सांगताना म्हणतात, “१९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेले बलविंदर संधू हे समीर चौघुलेंचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळे ते १९८३ च्या क्रिकेट टीमच्या ग्रुपवर हास्यजत्रेचे व्हिडीओ शेअर करत असतात. ही गोष्ट मला सुनील गावस्करांनी सांगितली होती. याशिवाय सचिन तेंडुलकर सर सुद्धा हास्यजत्रा पाहतात.”

“या गोष्टी जेव्हा मी ऐकतो तेव्हा खरंच थक्क व्हायला होतं. आपला कार्यक्रम सर्वत्र पोहोचलाय याचा अभिमान वाटतो” अशा भावना यावेळी समीर चौघुलेंनी व्यक्त केल्या.

devendra fadnavis and smir choughule
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुले यांची भेट

दरम्यान, समीर चौघुलेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतेच ते ‘गुलकंद’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांच्यासह या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.