‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्याच्या ‘Shaky’ या नव्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण संजूच्या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवत आहेत. या गाण्यामध्ये संजूसह हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणाऱ्या ईशा मालवीयची वर्णी लागली आहे.
संजूच्या या ‘Shaky’ गाण्यावर “एक नंबर, तुझी कंबर…” म्हणत मराठी कलाविश्वातील जुळ्या बहिणी थिरकल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघीही एकाच मालिकेत काम करतात. यापैकी एकीने गुलाबी रंगाचा तर, दुसऱ्या बहिणीने सेम पॅटर्नचा जांभळ्या रंगाचा ड्रेस घालून ‘Shaky’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या दोघी नेमक्या कोण आहे जाणून घेऊयात…
‘झी मराठी’ वाहिनीवरील २०१७ ते २०१९ या काळात ‘लागीरं झालं जी’ ही मालिका प्रसारित केली जायची. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. यामध्ये अभिनेत्री विद्या सावळे यांनी या मालिकेत पुष्मा मामी ही भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रचंड गाजली. यानंतर विद्या यांनी ‘जीव झाला येडापिसा’, ‘राजा राणीची गं जोडी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं.
सध्या विद्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत काम करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या मालिकेत त्यांच्या दोन जुळ्या मुली देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विद्या यांना नेहा आणि निकिता अशा दोन जुळ्या मुली आहेत. या दोघी ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये सवी व कवी या भूमिका साकारत आहेत. यापैकी नेहाने यापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत काम केलं होतं.
दरम्यान, विद्या सावळे यांच्या जुळ्या मुलींचा म्हणजेच नेहा आणि निकिताचा ‘शेकी’ गाण्यावरील डान्स सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी या दोघींचंही कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे. तर, ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता ‘सन मराठी’वर प्रसारित केली जाते.