सध्या कॉन्टेन्ट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्सचा जमाना आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉन्टेन्ट क्रिएटर्सना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कॉन्टेन्ट क्रिएटर्सही सेलिब्रेटींइतकेच प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक जोडी म्हणजे अभि अँड नियू.
अभि अँड नियू म्हणजेच अभिराज आणि नियती. हे दोघं देशातील आघाडीच्या कॉन्टेन्ट क्रिएटर्सपैकी एक आहेत. हे दोघं एकत्र मिळून विविध विषयांची सखोल माहिती सर्वांसमोर आणत असतात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. पण अभिराज हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा मुलगा आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
अभिराज आणि नियती हे नवरा-बायको आहेत. अभिराजचं नाव अभिराज राजाध्यक्ष आहे. हे दोघं एकत्र मिळून विविध विषयांवरील व्हिडीओ सर्वांसमोर आणत असतात. त्यांच्या व्हिडीओंना खूप चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो. हे दोघं एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा मुलगा आणि सून आहेत. ही अभिनेत्री म्हणजे अनुराधा राजाध्यक्ष. अनुराधा राजाध्यक्ष गेली अनेक वर्षं विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आतापर्यंत अनेकदा त्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या मुलाच्या आणि सूनेच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.
अनुराधा राजाध्यक्ष आणि अभिराज-नियती यांच्यातील नात्याबद्दल कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. कारण अभिराज हा अनुराधा यांचा मुलगा आहे हे फार कोणालाही माहीत नव्हतं.