Delnaaz Irani Talk About Bigg Boss Show : ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. हिंदी आणि मराठीसह हा शो इतर काही भागांतही होतो. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये आजवर अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळते. अशातच या शोच्या एका स्पर्धकानं फक्त पैशांसाठीच हा शो केला असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री डेलनाज ईराणी या ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, हा शो करण्यामागे त्यांचा एकच हेतू होता, तो म्हणजे पैसे कमावणे. तसंच शोमध्ये प्रवेश करताच पहिल्या २० सेकंदांतच त्यांना कळलं होतं की, त्यांना शोमध्ये त्यांच्या टॅलेंटसाठी नाही तर घटस्फोटामुळे बोलावलं गेलं आहे.

हिंदी रश या माध्यमाशी बोलताना डेलनाज यांनी आपले बिग बॉसमधील अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, “बिग बॉस करण्याचं कारण आर्थिक अडचण नव्हती, माझं कुटुंब कायम माझ्या पाठीशी होतं. पण, मी कायम स्वाभिमानानं जगली आहे. आई-बाबांनी मला सर्वकाही दिलं, पण जेव्हा आपण काम करायला लागतो, तेव्हा कोणावर अवलंबून राहावं असं वाटत नाही. मग तो नवरा असो किंवा वडील. अभिनय ही माझी आवड होती, पण हळूहळू तो माझा आवडता व्यवसाय बनला आणि मग याच क्षेत्रात मी कधी स्वतःच्या पायांवर उभी राहिले हे मलाच कळलं नाही.”

टॅलेंटमुळे नव्हे, तर घटस्फोटामुळे ‘बिग बॉस’मध्ये बोलावलं गेलं

यानंतर त्यांनी सांगितलं की, “बिग बॉसची ऑफर आली तेव्हा मी कुणाकडून पैसे मागायचे नाहीत असं ठरवलं होतं. ऑफर आल्यावर मीच थोडी आश्चर्यचकित झाले की मी कशी काय शोमध्ये ‘कंटेस्टंट’ म्हणून सहभागी होऊ शकते. पण जेव्हा मी शोमध्ये गेले, तेव्हा माझा एक्सही तिथे होता. त्याला पाहिल्यानंतर मला जाणवलं की मी बरंच काही करू शकते. पण, मला तेव्हा स्पष्ट कळलं की त्यांनी मला एक अभिनेत्री म्हणून नाही, तर ‘घटस्फोटित’ म्हणून शोमध्ये घेतलं होतं.”

शोमध्ये मसाला हवा होता, पण मी माझ्या मर्यादेत राहून खेळले

यानंतर डेलनाज सांगतात, “मी ठरवलं होतं की शोमध्ये १४ आठवडे टिकायचं, ट्रॉफी मिळो वा न मिळो. माझं उद्दिष्ट फक्त काम पूर्ण करून पैसे कमावणं आहे. मी ठरवलं होतं की मी जशी आहे तशीच राहणार. खोटी भांडणं, शिवीगाळ, आरडाओरडा काही करणार नाही. आता तर सगळ्यांना माहीत आहे की अशा शोमध्ये किती ‘रिअ‍ॅलिटी’ असते आणि किती ‘ड्रामा’ असतो. ‘बिग बॉस’ला मसाला हवा असतो, पण मी माझ्या मर्यादेत राहून माझं काम केलं.”