Devmanus Fame Marathi Actress : ‘देवमाणूस’ मालिकेमुळे अभिनेत्री अस्मिता देशमुख घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर तिने ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत सुद्धा प्रमुख भूमिका साकारली. अस्मिताने तिच्या सहज सुंदर अभिनयाने अल्पावधीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

अलीकडच्या काळात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना अनेक गैरप्रकार घडल्याचे आपण पाहतो, असंच काहीसं अस्मिताच्या बाबतीत सुद्धा घडलं आहे. आपल्याप्रमाणे अन्य कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत तिच्याबरोबर घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.

अस्मिता म्हणते, “नमस्कार! व्हिडीओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की, जेवढे सेलिब्रिटी आहेत, जेवढे रीलस्टार आहेत त्यांना मला अलर्ट करायचं आहे. एक महत्त्वाची माहिती या व्हिडीओमार्फत मी देऊ इच्छिते. मध्यंतरी मी एका दहिहंडीच्या इव्हेंटला गेले होते आणि हा इव्हेंट मला दिला होता सुजित सरकाळे याने…आणि माझ्याबरोबर अन्य काही सेलिब्रिटी सुद्धा या इव्हेंटला आले होते. इव्हेंटला जाण्याआधी त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले होते. स्क्रीनशॉटमध्ये मला दिसत होतं की पैसे आलेत…पण, माझ्या अकाऊंटमध्ये ते पैसे आलेच नव्हते. त्यामुळे त्याने मला कारणं दिली की, सर्व्हर डाऊन आहे, बँकेची समस्या आहे. तर, मी म्हणाले ठिके चला येतील पैसे…एक-दोन दिवस झाले…असाच आठवडा झाला.”

“त्यानंतर मला एक खूप मोठी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे माझ्याबरोबर खूप मोठा स्कॅम घडलेला आहे. असाच स्कॅम इतरांच्या बाबतीतही घडू शकतो. त्याने दाखवताना असं दाखवलं की, तुम्हाला पैसे आलेत…पण, खरंतर ते आपल्यापर्यंत आलेलेच नसतात. हा स्कॅम गुगल पे-फोन पे या माध्यमांवर होतोय. शेवटी मला पैसे मिळालेच नाहीत. त्यानंतर मी खूप वेळा पैसे मागितले, नीट समजावलं… नंतर पोलिसांत सुद्धा तक्रार दिली. त्यांना सुद्धा त्याने गंडवलं.”

“मी सर्वांना कळकळीची विनंती करते की, सुजित सरकाळे या माणसाबरोबर पुन्हा कधीच इव्हेंट करू नका किंवा इव्हेंटला जायच्या आधी पूर्ण पैसे घ्या. पैसे अकाऊंटमध्ये जमा झालेत की नाही याची खात्री करा आणि मगच इव्हेंटला जा. कारण, ही फसवणूक माझ्या बाबतीत झालीये… तुमच्याबाबतीत असं होऊ नये म्हणून मी हा व्हिडीओ शेअर केला होता.” असं अस्मिताने स्पष्ट केलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना अभिनेत्रीने संबंधिताचा फोन नंबर आणि इन्स्टाग्राम आयडी सुद्धा मेन्शन केला आहे.