Devmanus fame actor completes PhD: लोकप्रिय मराठी अभिनेते मिलिंद शिंदे हे त्यांच्या अफलातून भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अनेक मालिकांतील डायलॉग लोकप्रिय ठरलेले आहेत.
मिलिंद शिंदे यांनी ‘वादळवाट’, ‘अग्नीहोत्र’, ‘तू तिथे मी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, अशा अनेक मालिका आणि ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘घात’, ‘आकांत’, ‘रानू’, ‘बाबू बँड बाजा’ अशा चित्रपटांत काम करत त्यांची ओळख निर्माण केली.
सध्या मिलिंद शिंदे ‘देवमाणूस’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्यांनी मार्तंड जामकर ही भूमिका साकारली आहे. सतत गंभीर राहणारे, गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवणारे, न्यायासाठी काहीही करणारे हे मार्तंड जामकर सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
मिलिंद शिंदे यांनी ही भूमिका अशा पद्धतीने साकारली आहे की, त्यांचे डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. आता अभिनेते त्यांच्या भूमिकेमुळे, चित्रपटामुळे किंवा कोणत्या मालिकेमुळे चर्चेत नाहीत; तर त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती शेअर केली आहे.
मिलिंद शिंदे यांनी पूर्ण केली पीएचडी
मिलिंद शिंदे यांनी एक सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यावर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून पीएचडी पूर्ण केल्याचे दिसत आहे. त्यांनी परफॉर्मिंग आर्ट्स (Performing Arts) या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. विजय तेंडुलकरांच्या नाटकातील स्त्री भूमिका हा त्यांच्या प्रबंधाचा विषय असल्याचे या सर्टिफिकेटवर दिसत आहे.
ही पोस्ट शेअर करताना मिलिंद शिंदे यांनी लिहिले की, पीएचडी पूर्ण केली, आता तुम्ही मला डॉक्टर मिलिंद शिंदे म्हणू शकता, धन्यवाद. असे लिहित त्यांनी त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती दिली. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
मिलिंद शिंदे नुकतेच आणखी एका कारणामुळे चर्चेत आले होते. झी मराठी वाहिनीच्या मंचावर त्यांनी त्यांची पत्नी प्राजक्ताला प्रपोज केले. तसेच, त्यांनी रोमँटिक गाण्यावर डान्सदेखील केला. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते खूश झाल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
‘देवमाणूस’ या मालिकेबद्दल बोलायचे, तर गोपाळ त्याच्या पैशांच्या लोभापायी अनेकांना मारत असल्याचे दिसत आहे. त्याने केलेला गुन्हा लपवण्यासाठी तो अनेक युक्त्या शोधून काढतो. सर्वांसमोर देवमाणूस असणारा गोपाळ खरेतर राक्षसी प्रवृत्तीचा आहे. आता मार्तंड जामकर तोच गुन्हेगार असल्याचे शोधून काढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माधुरीच्या खूनानंतर देवमाणूस मालिकेत नेमके काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.