Devmanus Fame Milind Shinde Lovestory : मिलिंद शिंदे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर विविध माध्यमांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या ते ‘देवमाणूस’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अशातच त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

मिलिंद शिंदे यांनी नुकतीच ‘दूरदर्शन सह्याद्री’ला सहपत्नीक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलंय. त्यांच्या लग्नाला त्यांच्या सासुबाईंचा सुरुवातीला विरोध असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.

‘अशी’ झालेली पहिली भेट

मिलिंद यांच्या पत्नी प्राजक्ता शिंदे यांनी त्यांची ओळख फेसबुकमार्फत झाल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “फेसबुकवर ओळख झाली. मी त्याला रिक्वेस्ट पाठवली होती, त्यांनी ती अक्सेप्ट केली आणि मग त्यानंतर आमच्यात गप्पा सुरू झाल्या. माझा एक मित्र आहे, तो इव्हेंट ऑर्गनाइज करतो आणि त्यानिमित्तच आमची पहिली भेट झाली. मग एकमेकांचे नंबर घेतले आणि बोलणं सुरू झालं.”

मिलिंद शिंदे यांच्या पत्नी पुढे म्हणाल्या, “आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलायचो. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की हा मला प्रपोज करेल आणि अचानक एका रात्री फोन आला आणि मला म्हणाला एकत्र राहायला सुरुवात करुयात; तेव्हा मला धक्का बसला. मी थोडा विचार केला, पहिल्यांदा नाही म्हटलं. पण, नंतर आम्ही भेटलो तेव्हा मला जाणवलं की हा थोडा वेगळा आहे आणि मग प्रेमकहाणी सुरू झाली.”

पुढे या दोघांना तुमच्या लग्नाला विरोध झाला नाही का असं विचारल्यानंतर प्राजक्ता म्हणाल्या, “विरोध झाला.” मिलिंद शिंदे पुढे म्हणाले, “हिच्या आईने मला विचारलं, तुम्ही असं मालिकेत बायकांना मारता वगैरे, खऱ्या आयुष्यात आमच्या मुलीबरोबर केलं तर काय करायचं. पण, भूमिकेमुळे माझी इमेजच तशी झालेली. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला ५-६ महिन्यात कळेल.”

प्राजक्ता पुढे म्हणाल्या, “मी त्यांच्यातला माणूस पाहिला, मला तो आवडला आणि मग मी घरी सांगितलं की मला तो आवडतो म्हणून. त्यानंतर वडिलांनी सांगितलं, ठीक आहे, बोलाव त्यांना. मग हा माझ्या घरी आला, मागणी घातली.” आता मिलिंद शिंदे व प्राजक्ता शिंदे यांच्या लग्नाला अडीच वर्ष झाल्याचं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.