Dhananjay Powar : कोल्हापूरचा डीपी दादा म्हणजेच सर्वांचा लाडका धनंजय पोवार सध्या ‘मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग’साठी दुबईला गेला आहे. दुबईला पोहोचताच डीपी दादाने सर्व चाहत्यांशी लाइव्ह येऊन संवाद साधला होता. यावेळी त्याने दुबईतील क्रिकेट स्टेडियमची झलक सर्वांना दाखवली होती. आता धनंजयने नुकताच दुबईतून शेअर केलेला एक खास व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

धनंजय पोवारचं कोल्हापुरी मटणावर असलेलं प्रेम हे ‘बिग बॉस’ या शोपासून सर्वश्रुत आहे. कारण, शोमध्ये एन्ट्री घेताना सुद्धा डीपी सर्वांना, ‘बिग बॉस’च्या घरात मला मटण खायला मिळणार नाही याचं सर्वात जास्त दडपण आहे असं म्हणाला होता. याशिवाय डीपी दादा शोमध्ये गेल्यावर त्याची पत्नी व कुटुंबीयांनी सुद्धा राहत्या घरात मटण शिजवलं नव्हतं. पण, तुम्हाला माहितीये का धनंजयला जेवढं मटण आवडतं, तेवढाच छान तो मटणाचा रस्सा बनवू देखील शकतो.

डीपीने दुबईमधील रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जाऊन स्वत: खास महेश मांजरेकरांसाठी मटण बनवलं. याचा व्हिडीओ धनंजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो, “तर महत्त्वाचं काय आहे माहितीये का तुम्हाला…हे मटण शिजवलंय धनंजय पोवारने म्हणजे मी स्वत: आणि हे मटण मी महेश मांजरेकर सरांना सर्व्ह करणार आहे.”

यानंतर मटण बनवून झाल्यावर धनंजय हे मटण महेश मांजरेकर यांच्यापुढे सर्व्ह करतो. यावेळी अभिनेता अक्षय वाघमारे आणि पृथ्वीक प्रताप सुद्धा याठिकाणी उपस्थित असतात. अक्षय ‘क्या बात’ असे एक्स्प्रेशन्स देत सुरुवातीलाच डीपीचं कौतुक करतो. महेश मांजरेकर जेव्हा धनंजयच्या हातचं मटण टेस्ट करतात…तेव्हा ते काही सेकंदाच्या आत ‘खूप छान झालंय’ अशी प्रतिक्रिया त्याला देतात. ज्यांच्यासाठी खास हे मटण बनवलं त्यांना आवडल्यावर धनंजयच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान येतं.

नेटकऱ्यांनी डीपीच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “डीपी दादांचा नाद करायचा नाही”, “दादा आता एक हॉटेल सुरू करा”, “वाह दादा वाह”, “कोल्हापुरी मटण दादा आता एकच टार्गेट हॉटेल सुरू करा”, “लय भारी डीपी दादा”, “दणका विषय जबरदस्त” अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.