Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada TV Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर सात महिन्यांपूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा आणि तुळजावर मनापासून प्रेम करणाऱ्या सूर्या दादाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यामध्ये नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांची फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत आहे. मात्र, नुकतीच दिशाने ही मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे.

दिशा परदेशीने ‘तुळजा’ या भूमिकेचा निरोप घेत ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्रीने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यावर तिच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आता हा मोठा निर्णय घेतल्यावर दिशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“मायबाप रसिकहो! खूप प्रेम दिलंत तुम्ही… ‘लाखात एक आमचा दादा’ ही माझ्यासाठी फक्त एक मालिका नाहीतर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरांत हसत खेळत बागडण्याची संधीच जणू… आणि माझं काय स्वागत केलंय तुम्ही… स्वत:च्या मुलीसारखं प्रेम केलंत. सुनेसारखे लाड केलेत. पण, आता झालंय असं की, एका तब्येतीच्या सुरू असलेल्या अडचणीमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे. पण तरी एका नव्या भूमिकेत तुमचं मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज होईन अशी खात्री आहे. माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा.” असं दिशाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“मला खात्री आहे की, जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही नवीन तुळजाला द्याल. मी जरी मालिका सोडून जात असले तरीही ही माझीच मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहीन, कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे. जरी हा प्रवास इथे थांबला असेल तरी मी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा सदैव भाग राहीन.” असंही दिशाने सांगितलं आहे.

Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada TV Serial
दिशा परदेशीची पोस्ट ( Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada TV Serial )

प्रकृतीच्या कारणास्तव दिशा या मालिकेतून एक्झिट घेत आहे. आता तिच्याऐवजी मालिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर झळकणार आहे. मृण्मयीने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मध्ये राजमाची भूमिका साकारली होती. आता मृण्मयीच्या रुपात प्रेक्षकांना नवीन तुळजा पाहायला मिळेल.

Story img Loader