Actor left TV industry and doing farming: टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या काही मालिका प्रचंड गाजतात. त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहते. अशा लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमधील कलाकार अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात त्यांचे स्थान निर्माण करतात.
काही कलाकार विविध भूमिका, वेगळे प्रोजेक्ट अशा माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, काही कलाकार पुन्हा दिसत नाहीत.
‘दिया और बाती हम’ मालिकेतून मिळालेली लोकप्रियता
आज आपण अशाच एका कलाकाराबाबत जाणून घेणार आहोत. स्टार प्लस वाहिनीवर २०११ ला ‘दिया और बाती हम’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. २०१६ पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
मालिकेतील सूरज, संध्या, भाभो, मीनाक्षी अशा सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कलाकारांना आणि मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
या मालिकेत सूरज ही भूमिका अभिनेता अनस राशिदने साकारली होती. या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, हा अनस सध्या कोणत्या मालिका किंवा टीव्ही शोमध्ये दिसत नाही. याचे कारण म्हणजे त्याने अभिनयाचे क्षेत्र सोडले आहे. तर अनस सध्या करतो काय?
अनस गेल्या काही वर्षांपासून अभिनय सोडून शेती करत आहे. तो आता शेतकरी आहे. अभिनेता आता मुंबईत नाही तर आता पंजाबमधील त्याच्या मूळ गावी मालेरकोटला येथे राहतो. तिथे तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहतो.
अनसने ‘कहीं तो होगा’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तो ‘वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’मध्येदेखील दिसला होता. या शोमधून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या शोला यश मिळाल्यानंतर त्याला ‘दिया और बाती हम’ या मालिकेतील भूमिकेसाठी विचारणा झाली. त्याने या मालिकेत एका अशिक्षित मिठाईवाल्याची भूमिका साकारली होती.
‘दिया और बाती हम’ या मालिकेतून अभिनेत्याला मोठी लोकप्रियता मिळाली. सूरज व संध्याची जोडी चांगलीच गाजली. या शोमध्ये दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली असली तरी खऱ्या आयुष्यात त्यांचे पटत नव्हते. काही रिपोर्ट्सनुसार काही गैरसमजांमुळे दीपिकाने अनसला कानाखाली मारली होती. या घटनेनंतर दोघेही एकमेकांबरोबर बोलत नाहीत.
दरम्यान, ‘दिया और बाती हम’नंतर अनस कोणत्याही शोमध्ये दिसला नाही. सध्या अनस प्रसिद्धीझोतापासून दूर त्याच्या कुटुंबासह सामान्य जीवन जगतो. या अभिनेत्याने २०१७ मध्ये लग्न केले.
