Gaurav More New Home : म्हाडा लॉटरीमध्ये गौरव मोरेला पवईत घर मिळाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. अखेर या नव्या घराचा ताबा अभिनेत्याला काही दिवसांपूर्वीच मिळाला आणि त्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे. फिल्टरपाड्याच्या बच्चनने हक्काच्या फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबीयांसह सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस गृहप्रवेश केला. ही आनंदाची बातमी गौरवने सोशल मीडियावर शेअर केली होती.
नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर गौरवला त्याच्या नव्या घराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणतो, “आताच मी घर घेतलं…सर्वांनी नव्या घरासाठी माझं कौतुक केलं कारण, प्रत्येकाला असं वाटतं की तू आयुष्यात मोठा होतोय म्हणजे आमच्या घरातील मुलगा पुढे जातोय, मोठा होतोय. घर ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची असते. अर्थात आपल्याकडे राहतं घर असतं पण, आपल्या कुटुंबासाठी मोठं काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाची असते. आपल्या कुटुंबासाठी काहीतरी घ्यावं अशी माझी सुद्धा इच्छा होती. आता घर घेतल्यावर इतकं छान वाटतंय. तो आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”
“मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगून ठेवलंय…हे आपलं घर आहे. जसं तुम्ही सगळे फिल्टरपाड्याच्या घरी यायचात. तसे आताही या…फिल्टरपाडा ते आताचं नवीन घर हे फारतर दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे. फिल्टरपाड्याचं घर सुद्धा नाक्यावर आहे आणि हे घर सुद्धा नाक्यावर आहे.” अशा भावना गौरवने व्यक्त केल्या.
काही दिवसांपूर्वीच गौरवच्या आईने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एन्ट्री घेतली होती. याबद्दल विचारलं असता अभिनेता म्हणाला, “माझ्या आईला टीव्हीवर झळकायला खूप आवडतं. तिला सिनेमात काम करण्याची खूप इच्छा आहे. आता भविष्यात बघुयात अशी संधी केव्हा मिळते. आता माझे मित्र घरी येतात तेव्हा आई तिला कशाप्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे वगैरे असं सगळं त्यांना सांगत असते. आता आईमुळे इथपर्यंत पोहोचलोय त्यामुळे तिची इच्छा नक्की पूर्ण करणार.”
दरम्यान, नव्या घराचा ताबा मिळाल्यावर, “ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. घरच्यांना त्या नव्या घराचा आनंद घेताना बघून मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फिल्टर पाडा आणि पवईसह जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी म्हाडाचे मनापासून आभार मानतो.” अशी पोस्ट शेअर करत गौरवने भावना व्यक्त केल्या होत्या.