Women from abroad sang Wajle Ki Bara: टीव्हीवर जशा विविध जॉनरच्या मालिका प्रदर्शित होतात. तसेच, रिॲलिटी शोदेखील प्रदर्शित होतात. ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘इंडिया सुपर डान्सर’, ‘इंडिया गॉट टॅलेंट’, ‘स्प्लिट्सविला’, ‘रोडिज’, ‘इंडियन आयडॉल’, ‘मास्टरशेफ’ हे आणि असे अनेक शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

त्यापैकी रिअॅलिटी शोमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील तसेच काही वेळा देशाबाहेरील प्रतिभावान व्यक्ती दिसतात. या माध्यमातून सामान्यांना देशासमोर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना अशा टीव्ही शोजमधून मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पुढच्या करिअरसाठी त्याची त्यांना मोठी मदत झाली आहे.

याबरोबरच, अशा रिअॅलिटी शोमधील कलाकारांच्या सादरीकरणाने अनेकदा प्रेक्षक थक्क होतात. मग तो एखादा डान्स असो, एखादे गाणे असो वा त्यापेक्षा एखादी वेगळी काही कला असो, कलाकार त्यांच्या अफलातून संकल्पना आणि वैविध्यपूर्ण कल्पना यांमुळे प्रेक्षकांची मने जिंकतात.

आता असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या ११ व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. सध्या ऑडिशन सुरू असून, विविध स्पर्धक या मंचावर त्यांच्या कला सादर करताना दिसत आहे. कोणी गाणे गात आहे, कोणी डान्स, तर कोणी जादूचे प्रयोग करीत परीक्षकांची मने जिंकत आहे.

सातासमुद्रापार पोहोचली मराठी लावणी

अशातच एक व्हिडीओ चाहत्यांचीही मने जिंकत आहे. या व्हिडीओमध्ये तीन स्पर्धक ‘मला जाऊ दे ना घरी आता वाजले की बारा’ ही मराठी लावणी गात असल्याचे दिसत आहे. त्यांनी मराठी पारंपरिक नऊवारी साडीदेखील नेसली आहे. त्यांनी हातात बांगड्या, गळ्यात हार व कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.

विशेष म्हणजे या तीन महिला मराठी किंवा महाराष्ट्रातील नसून, परदेशातील आहेत. तरीही गाण्याचे बोल त्या अतिशय स्पष्टपणे म्हणत आहेत. मूळ गाणे जसेच्या तसे म्हणण्याच्या प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचे गाणे ऐकून परीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शेवटी परीक्षक जागेवर उभे राहून त्यांच्या गाण्याला दाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने अमृता खानविलकरला टॅग केले आहे. त्यावर अमृताने मी त्यांना भेटले आहे, असे लिहिले आहे. तर अभिनेता अंशजिंक्य राऊतनेदेखील इमोजी शेअर केली आहे.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

तर नेटकऱ्यांनी लिहिले, “मराठी असल्याचा अभिमान आहे. जय महाराष्ट्र”, “जय महाराष्ट्र”, “आम्हाला सार्थ अभिमान आहे मराठी भाषेचा. जय महाराष्ट्र, खूप सुंदर”, “इंग्रजी लोकांनी मुंबई, महाराष्ट्राचा आदर केला”, “वाह! मराठी लावणी इंग्रजी कलाकार सादर करताना खरंच भारी”, “आपल्या मराठीचा दरारा”, “मराठीला कुठे तोड नाही जय महाराष्ट्र”, “महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर राज्यांतील लोकांनी यातून काही शिकावं. लाज वाटली पाहिजे, हे बघून तरी सुधारा. अनेक वर्षं महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करीत असतात”, “मराठी सर्वांत पुढे” , “आपली मायबोली, वेड लावणारी आपली लावणी ही सातासमुद्रापार पोहोचली ती अशीच नाही”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, या शोचे परीक्षक शान, मलायका अरोरा व नवज्योत सिंह सिद्धू हे आहेत. आता या शोमध्ये पुढे काय होणार, आणखी कोणते कलाकार आणि कलागुण पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.