Vidya Sawale Talks About Single Parenting : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या मुलांचा एकट्यानं सांभाळ करीत आहेत. अभिनेत्री मानसी साळवी, स्मिता शेवाळे, सलील कुलकर्णी हे कलाकार त्यांच्या मुलांचा एकट्यानंच सांभाळ करीत आहेत. ही कलाकार मंडळी एकल पालकत्वाबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीनं एकटीनं मुलींना वाढवतानाच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

‘लागीर झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री विद्या सावळे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एकटीनं जुळ्या मुलींना वाढवतानाच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांना त्यांच्या आई-वडिलांची कशी मदत झाली याबद्दलही सांगितलंय. विद्या यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं.

विद्या सावळे यांनी सांगितला संघर्षकाळ

विद्या याबद्दल सांगताना मुलाखतीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना एकल पालकत्वाबद्दल विचारल्यानंतर विद्या म्हणाल्या, “मुली शाळेत जायला लागल्यापासूनच मी त्यांना माझ्या माहेरी वाढवलंय. माझ्या आई-वडिलांशिवाय ही गोष्ट शक्यच नव्हती. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं हे माझं स्वप्न होतं. मला माझं स्वप्नही पूर्ण करायचं होतं, मुलींकडेही लक्ष द्यायचं होतं आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरता हवी होती. मग मी ठरवलं की, ठिके करूयात. हळूहळू मग मी सुरुवातीला एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी केली “

विद्या सुरुवातीच्या संघर्ष काळाबद्दल पुढे म्हणाल्या, “तेव्हा मी जाहिरातींना आवाज देणं अशी छोटी-मोठी कामं करीत होते. खूप वर्ष मी ते केलं. त्यादरम्यान ऑडिशनही देत होते आणि माझ्या मुली दहावीला होत्या तेव्हा मला माझी पहिली मालिका ‘लागीर झालं जी’ मिळाली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला.”

विद्या पुढे त्यांच्या आईबद्दल म्हणाल्या, “देवानं मला खूप चांगली आई दिली. कारण- तिच्याशिवाय हे सगळं शक्यच नव्हतं. कारण- मी जेव्हा बाहेर असायचे तेव्हा माझ्या आईनं मुलींना खूप सांभाळलं आहे. तिच्या मुली असल्यासारख्या त्या वाढल्या. त्यामुळे मी तिची आभारी आहे.” संघर्ष काळाबद्दल सांगताना विद्या यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, विद्या सावळे यांनी ‘झी मराठी’वरील ‘लागीर झालं जी’ मालिकेत नितीश चव्हाणच्या मामीची भूमिका साकारलेली. त्यामधून त्या खलनायिका म्हणून समोर आल्या. याच मालिकेमुळे त्या खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचल्या. सध्या त्या ‘सण मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.