अभिनेत्री माही विज व अभिनेता जय भानुशाली यांची मुलगी तारा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तारा यावेळी चर्चेत असण्याचं कारण तिचा वाढदिवस आहे. जय आणि माहीची चार वर्षांची मुलगी तारा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. सध्या जय आणि माहीच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. कारण, त्यांची लाडकी मुलगी तारा तिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली आहे.
जय भानुशाली आणि माही विज यांची मुलगी तारा ३ ऑगस्ट २०२३ रोजी चार वर्षांची झाली. या जोडप्याच्या लेकीला एक सुंदर भेट मिळाली. ती टाइम्स स्क्वेअरवर झळकली. जयने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवरील ताराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तारा मस्ती करताना दिसत आहे आणि ती खूप क्यूट दिसत आहे. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर तिचा व्हिडीओ दाखवलं जाणं ही चार वर्षांच्या तारासाठी नक्कीच मोठी उपलब्धी आहे.
माहीने आपल्याला मुलीचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. तर जयने आपल्यालाही मुलीइतकंच चाहत्यांकडून प्रेम मिळायला हवं, ती टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, जय आणि माहीचे लग्न २०११ मध्ये झाले. सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर या जोडप्याने खुशी आणि राजवीरला दत्तक घेतलं. त्यानंतर ३ ऑगस्ट २०१९ रोजी माही आणि जय त्यांची मुलगी ताराचे पालक झाले.